
मिळकतपत्रिकेवरील नोंदी आता घरबसल्या; भूमी अभिलेख विभागाकडून नवीन संगणकीय प्रणाली!
पुणे : मिळकतपत्रिकेवरील खरेदी नोंदी आणि वारसा नोंद करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने ‘ईप्सित’ (इलेक्ट्राॅनिक सिस्टीम इंटिग्रेडेट टू) संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन अर्ज करून मिळकतपत्रिकेवरील नोंदी घरबसल्या करता येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने सातबारा उताऱ्यावरील वारस नोंद, कर्ज बोजा दाखल करणे किंवा कमी करण्यासाठी ई हक्क प्रणालीद्वारे ही सुविधा दिली आहे. त्याच धर्तीवर ‘ईप्सित’ संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे.
मिळकतपत्रिकेवरील वारसा नोंदीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार असून खरेदी नोंदीसाठी, बक्षीसपात्र नोंदी, गहाणखत, बोजा दाखल करणे किंवा कमी करणे आणि हक्कसोड पत्राच्या नोंदी ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहेत. त्यासाठी htttps://epsit.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर मिळकतपत्रिकेवरील फेरफारसाठीचा अर्ज करता येणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम ईप्सित प्रणालीमध्ये नागरिकांना मोबाइल क्रमांक द्यावा लागणार असून, स्वतंत्र लाॅगिन करावे लागणार आहे. स्वत:च्या लाॅगिनमधून अर्ज करता येणार आहे. नागरिकांनी अर्जाच्या सर्व नोंदीची माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे. त्या अर्जाची सद्य:स्थितीही संबंधित अर्जदारांना ऑनलाइन पाहता येणार आहे.
दरम्यान, दोन हजार लोकसंख्या असलेल्या वाड्या आणि गावांची मिळकतपत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) तयार करण्याचे काम भूमी अभिलेख विभागाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामाला प्रारंभ झाला असून, राज्यातील प्रमुख शहरांतील सर्व मिळकतींचे प्राॅपर्टी कार्ड तयार करण्यात आले आहे. राज्यात ९१ लाख मिळकतींची पत्रिका तयार करण्यात आल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाकडून देण्यात आली.