
त्यांना आम्ही जा असं म्हटलेलं नव्हतं. त्यांना वाटलं म्हणून ते गेलेले आहेत. आता दिल्या घरी सुखी रहा -शिवसेना नेते आमदार राजन साळवी
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार अस्तित्वात आलं असलं, तरी शिवसेनेतील संघर्षाला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही.
शिंदे गटातील आमदारांकडून मांडल्या जात असलेल्या भूमिकांवर शिवसेनेकडूनही उत्तर दिली जात असल्याचं दिसत आहे. शिवसेनेविरोधात बंड केलेल्या आमदारांबद्दल राजन साळवी यांनीही भूमिका स्पष्ट केली असून, भविष्यात धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढवणारा विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना राजन साळवी आज रत्नागिरी येथे बोलत होते. शिवसेनेविरुद्ध बंडखोरी करून शिंदे गटात सामील झालेल्या आमदारांबद्दल बोलताना राजन साळवी म्हणाले, “धनुष्यबाण ही निशानी शिवसेनेचीच आहे, आणि हीच निशाणी आमची कायमस्वरूपी राहिल.”
रत्नागिरी-सिंधुदुर्गातील एकूण ३ आमदार शिंदे गटात गेले आहेत. याबाबत विचारलं असता, राजन साळवी म्हणाले, “संपूर्ण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यामध्ये उदय सामंत, दिपक केसरकर ही मंडळी राष्ट्रवादीतून आली होती. शिवसैनिकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे हे त्यांनाही आणि जनतेनेलाही माहिती आहे.”
“भविष्यात जे शिवसेनेच्या धनुष्यबाण निशाणीवर उभे राहतील, ते निवडून येतील. शिवसेनेला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल,” असा विश्वास राजन साळवी यांनी व्यक्त केला.
“जे आता शिवसेना सोडून गेले आहेत. जे दूर गेलेले आहेत, त्यांना आम्ही जा असं म्हटलेलं नव्हतं. त्यांना वाटलं म्हणून ते गेलेले आहेत. आता दिल्या घरी सुखी रहा,” असा टोला राजन साळवी यांनी बंडखोर आमदारांना लगावला
www.konkantoday.com