
वाटद-खंडाळा येथे एमआयडीसी प्रकल्पाविरोधात भव्य मोर्चा
रत्नागिरी जिल्ह्याच्या खंडाळा येथे प्रस्तावित संरक्षण शस्त्रसामग्री तयार करणाऱ्या प्रकल्पाविरोधात आज स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला. विशेष म्हणजे, हा प्रकल्प राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघांतर्गत येत असल्याने याविरोधातील जनआंदोलनाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाची सूचना रद्द करावी, या मुख्य मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.मोर्चा काढल्यानंतर खंडाळा येथे एक जाहीर सभा घेण्यात आली, ज्यामध्ये प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत, प्रकल्पाचे पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकला.

स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा प्रकल्प झाल्यास त्यांची शेती आणि उपजीविकेचे साधन हिरावले जाईल. तसेच, या भागातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पाला स्थानिकांकडून तीव्र विरोध होत असून, आजच्या मोर्चामुळे हा विरोध अधिकच तीव्र झाल्याचे दिसून आले.उद्यमंत्री उदय सामंत यांच्याच मतदारसंघातून त्यांच्याच खात्याशी संबंधित प्रकल्पाला होणारा विरोध, हे प्रशासनासाठी एक मोठे आव्हान मानले जात आहे. यावर सरकार काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
