
पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्यातील गृहनिर्माण संस्थांनी लाभ घ्यावा -जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे.
रत्नागिरी, दि. २ :- भारत सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेसाठी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्यांची निवड करण्यात आलेली आहे. या तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत देशात 1 कोटी घरांना सौर ऊर्जा सबसिडीद्वारे पुरविण्याचा लक्षांक निश्चित केला आहे. त्यासाठी देशातील 100 शहरांची निवड केली आहे. ‘हर घर सूर्य घर’ हा विषय यापुढे असणार आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तीन तालुक्यांमधील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावरील सौरऊर्जा साठी जागा उपलब्ध आहे, अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांची प्राधान्याने निवड करावयाची आहे. गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक तसेच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.000