
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पत्रकार राजन चव्हाण यांनी एलएलबी परीक्षेत मिळवले घवघवीत यश!
रत्नागिरी ): आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना आणि अनेक प्रतिकूल परिस्थितींचा सामना करत, पत्रकारितेच्या क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे कु. राजन चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एलएलबी (Bachelor of Laws) परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.चव्हाण यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सापुचेतळे या गावी झाले. त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांनी रत्नागिरी शहराची वाट धरली. घरची परिस्थिती बेताची असूनही, शिक्षणाची जिद्द आणि काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी त्यांच्या मनात कायम होती.
पत्रकारितेसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांनी आपले उच्च शिक्षणाचे ध्येय सोडले नाही. रत्नागिरी येथील नामांकित भागोजीशेठ कीर लॉ कॉलेजमधून त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि आता ते एलएलबी परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.राजन चव्हाण यांचे हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर कोणतीही परिस्थिती बदलता येते, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहे. सामाजिक भान जपत, पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच जनसामान्यांचे प्रश्न मांडले.
याचबरोबर, उच्च शिक्षण घेण्याची त्यांची ध्येयनिष्ठा कौतुकास्पद आहे.आपल्या या यशाचे संपूर्ण श्रेय राजन चव्हाण यांनी आपली बहीण योगिता शिवलकर यांना दिले आहे. बहिणीने दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि प्रेरणेमुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या यशाबद्दल रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. राजन चव्हाण यांच्या भावी कायदेशीर कारकिर्दीसाठी आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.