
भारत फोरकास्टिंग सिस्टिम या प्रणाली मुळे देशातील हवामान अंदाज आता अधिक अचूक!
देशातील हवामानाचे अंदाज आता अधिक नेमके होऊ शकणार आहेत. पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने (आयआयटीएम) विकसित केलेल्या ‘भारत फोरकास्टिंग सिस्टिम’ या स्वदेशी हवामान अंदाज प्रणालीचा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वापर केला जाणार असून, या अत्याधुनिक प्रणालीमुळे हवामान अधिक सूक्ष्म पातळीवर देणे शक्य होणार आहे.
केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते नुकत्याच दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात भारत फोरकास्टिंग सिस्टिम या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रवीचंद्रन, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र, आयआयटीएमचे संचालक डॉ. सूर्यचंद्र राव या वेळी उपस्थित होते. प्रणालीच्या विकसनात आयआयटीएममधील डॉ. मेधा देशपांडे, डॉ. फनी मुरलीकृष्णा, डॉ. सिद्धार्थ कुमार, डॉ. मलय गनई, डॉ. स्नेहलता तिरकी यांच्यासह १२ शास्त्रज्ञांनी योगदान दिले.
आतापर्यंत भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मान्सून मिशन प्रकल्पांतर्गत विकसित केलेली कपल्ड फोरकास्टिंग सिस्टिम (सीएफएस) वापरात आहे. या प्रणालीचा मूळ आराखडा अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंटल प्रेडिक्शन (एनसीईपी) या संस्थेने विकसित केला होता. मात्र, भारतीय गरजांनुसार त्यात बदल करून देशासाठी आवश्यक असलेले हवामान अंदाज अवकाशीय, कालावधीविषयक अचूकतेसह दिले जातात. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून ग्लोबल फोरकास्टिंग सिस्टिमचाही (जीएफएस) वापर केला जातो. ही प्रणाली महासागर आणि वातावरणातील घटक एकत्रित विचारात घेऊन काही तासांपासून संपूर्ण हंगामापर्यंतच्या हवामान अंदाजांसाठी वापरण्यात येते.
जितेंद्र सिंग म्हणाले, संभाव्य नुकसान टाळून आर्थिक वाढीला गती देणे, नफा वाढवणे हा हवामान अंदाजांतील अचूकतेचा उद्देश आहे. या स्वदेशी प्रणालीने भारताला हवामान अंदाज तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर आघाडीवर नेले आहे. आधुनिक, आत्मनिर्भर वैज्ञानिक उपाययोजना विकसित करण्याची क्षमता ही देशाच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. या प्रणालीसाठी मेहनत भारतीयांची आहे, तंत्रज्ञान भारतीय आहे आणि लाभार्थीही भारतीय असणार आहेत. तसेच या प्रणालीचा उपयोग जगभरातील इतर उष्णकटिबंधीय भागांनाही होणार आहे. ‘मिशन मौसम’साठी देण्यात आलेल्या दोन हजार कोटी रुपये निधीतून देशातील हवामान अंदाज यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जाणार आहे.
भारत फोरकास्टिंग सिस्टिमचे वेगळेपण काय?
जागतिक पातळीवर ९ ते १४ किलोमीटरपर्यंतचे हवामान अंदाज दिले जातात. मात्र, त्या पुढे जाऊन भारत फोरकास्टिंग सिस्टिमद्वारे ६ किलोमीटरपर्यंतचे हवामान अंदाज देण्यासह अतिवृष्टीच्या अंदाजांमध्ये ३० टक्के सुधारणा, मुख्य पर्जन्य क्षेत्रांमध्ये ६४ टक्के अधिक अचूकता येणे शक्य आहे. २०१७ मध्ये आयआयटीएमकडून ‘भारत फोरकास्टिंग सिस्टिम’ विकसनाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी ‘अर्क’ आणि ‘अरूणिका’ या महासंगणकांचाही वापर करण्यात आला. २०२२ मध्ये ही प्रणाली सादर करण्यात आली. तीन वर्षे त्याच्या प्राथमिक चाचण्या करण्यात आल्या.