
देहदान, अवयव दान, नेत्रदान ही जगातील सर्वश्रेष्ठ दान होत : समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव
आता देहदान करण्यासाठी रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही सुविधा उपलब्ध
कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा सन्मान
रत्नागिरी : जीवनात देहदान, अवयव दान आणि नेत्रदान ही कोणत्याही दानापेक्षा गरजूंना जीवनदान देणारी जगातील सर्वश्रेष्ठ दान आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी हे दान करण्यासाठी स्वतःला प्रवृत्त करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक श्री. रेशम जाधव यांनी कुवारबाव ज्येष्ठ नागरिक संघाच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना केले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे हे होते.कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 एप्रिल रोजी संघाचा मासिक स्नेह मेळावा उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना श्री. रेशम जाधव म्हणाले की, आता देहदान करण्यासाठी डेरवण येथे जाण्याची गरज नाही. रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा उपलब्ध झाल्याने जनतेचा या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी इच्छुकांनी आपल्या मरणोत्तर देहदान अथवा जिवंतपणी अवयव दानासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाचे नेत्रदान समुपदेशक श्री. राम चिंचोळे यांनी नेत्रचिकित्सा संबंधी माहिती दिली. नेत्रदान आणि शारीरिक सुदृढता कशी राखावी याविषयी तज्ञांनी सविस्तर माहिती दिली यावेळी आशादीप मतिमंद संस्थेचे संस्थापक संचालक श्री. दिलीप रेडकर यांना मनुष्यबळ विकास अकादमीचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा या सेवा मेळाव्यात विशेष सत्कार करण्यात आला. त्यानंतर एप्रिल महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचे सत्कार करण्यात आले. अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी उपस्थित मार्गदर्शक अधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
प्रारंभी ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्याम सुंदर सावंत देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून फेस कॉम च्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम यांनी आभार प्रदर्शन केले. मेळाव्याला ज्येष्ठांची मोठी उपस्थिती होती. पसायदानाने त्या मेळाव्याची सांगता करण्यात आली.