अंधेरीतील इमारतीला भीषण आग! महिलेचा मृत्यू; १० दिवसाच्या बाळासह सहाजण जखमी!!.

मुंबई :* अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमाराला भीषण आग लागली. या दुर्घटनेत अभिना संजनवालिया (३४) यांचा मृत्यू झाला, तर अन्य सहाजण जखमी झाले. जखमींमध्ये १० दिवसांच्या बाळासह एका चिमुकल्याचा समावेश आहे. दरम्यान, या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली.लोखंडवाला परिसरातील अशोक ॲकॅडमी लेनमधील आठ मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिका क्रमांक १०४ मध्ये मध्यरात्री अचानक आग लागली. त्यावेळी घरातील सर्वजण झोपले होते. त्यामुळे आग लागल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. क्षणातच आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केले आणि घरात धुराचे साम्राज्य पसरले. त्यामुळे घरातील सदस्य जागे झाले. तोपर्यंत आग आसपासच्या घरांमध्येही पसरली होती. आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी आरडाओरडा करीत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला.

अनेकजण सुरक्षितरित्या घराबाहेर पडले. मात्र, आग आणि धुरामुळे काही रहिवाशांना बाहेर पडता आले नाही. आगीत अपर्णा गुप्ता (४१), दया गुप्ता (२१), रीहान गुप्ता (३), प्रदुमना (१० दिवस), अभिना संजय वालिया (३४), कार्तिक संजय वालिया (४०), पोलम गुप्ता (४०) आदी अडकले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. मध्यरात्री ३ वाजून १३ मिनिटांनी आगीला क्रमांक एकची वर्दी देण्यात आली. धुरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना मदतकार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा करीत इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना अग्निशामकांनी बाहेर काढले. धुरात गुदमरल्यामुळे सर्वांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये नेण्यात आले. काहींना कोकिलाबेन, तर काहींना कूपर आणि ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले.

मात्र, अभिना संजय वालिया यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलम गुप्ता यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले असून अन्य जखमींवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलातर्फे आगीच्या घटनेची चौकशी सुरू आहे. या आगीत सदनिका क्रमांक १०४ मधील विद्युत यंत्रणा, विद्युत तारा, वातानुकूलित यंत्रणा, लाकडी सामान, फर्निचर, कपडे व अन्य घरगुती साहित्य जळून खाक झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button