
STचे जाहिरात उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा, प्रताप सरनाईकांचे निर्देश.
एसटी महामंडळाच्या बसेस तसेच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी सर्वंकष नवीन धोरण तयार करून त्यामाध्यमातून मिळणारे उत्पन्न १०० कोटी रुपयांपर्यंत वाढवावे अशा निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.तसेच राज्यभरात परिवहन विभागाच्या जिथे-जिथे जमिनी आहेत, त्या बहुतेक जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून टाकून, तेथे कुंपण भिंत घालावी, तसेच नामफलक लावण्यात यावा. असेही प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.परिवहन आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक बोलत होते.
सध्या ज्या जाहिरात संस्थांना काम दिले आहे, त्यांच्याकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांचे करार रद्द करावेत, अशा सूचना देऊन मंत्री सरनाईक म्हणाले की, चांगले उत्पन्न देणाऱ्या संस्थांची निवड करावी. सध्या जाहिरातीच्या माध्यमतून महामंडळाला २२-२४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. त्यामध्ये वाढ करुन हे उत्पन्न १०० कोटी करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. नवीन बस खरेदीमध्ये प्रवासी व बस यांची सुरक्षा लक्षात घेऊन जाहिरातीसाठी उपयुक्त पॅनेल बसवण्याची व्यवस्था करावी. तसेच जुन्या बसेसमध्येही याची व्यवस्था करण्यात यावी. बसस्थानके सुधारण्यासाठी नियोजन करावे.
बसस्थानकावर सुसज्ज महिला प्रसाधनगृहे उभारण्यात यावीत. राज्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष उभारून ते चांगल्या स्थितीत राहतील याची व्यवस्था निर्माण करावी. एसटी महामंडळ मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करते. यासाठीच्या भविष्यात निविदा काढताना त्यामध्ये सीएसआर फंड संबंधित संस्थेने एसटीसाठी खर्च करावा, अशी अट समाविष्ट करावी, अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी दिल्या.