
‘तथास्तु’ रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयात सुरेल गाणी आणि आठवणींची आज मैफल सजणार
रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालयाची जुनी वास्तू पाडून पुनर्बांधणीचे काम नियोजित आहे. त्या पार्श्वभूमीवर वाचनालयाने सुरेल सुरांची मैफल व आठवणी यांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. वास्तू नवनिर्मित करताना जुन्या वास्तूतील आठवणींना उजाळा द्यावा, वास्तुप्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि हया सर्व भावना रसिक श्रोत्यांच्या साक्षीने व्यक्त व्हाव्यात व नवनिर्मितीसाठी सगळ्यांच्या सकारात्मक भावना सदिच्छा प्राप्त करत जुन्या वास्तूला अलविदा करावे हा या आयोजना मागचा भावपूर्ण उद्देश आहे.तथास्तु कार्यक्रम दि. ७ नोव्हेंबर २०२४, गुरुवार रोजी सायंकाळी ६.१५ वा. रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सभागृहात होणार आहे. रत्नागिरीतील प्रतिथयश लोकप्रिय गायक व वादक सुरेल भावपूर्ण कार्यक्रम घेऊन येत आहेत. श्री.प्रसाद गुळवणी, श्री.आनंद पाटणकर, श्री.राम तांबे, श्री.नरेंद्र रानडे, सौ.मुग्धा भट-सामंत, सौ.श्वेता जोगळेकर, श्री.अभिजीत भट हे कलाकार सेवा म्हणून आपली काही गाणी सादर करणार असून त्यांना श्री.हेरंब जोगळेकर, श्री.चैतन्य पटवर्धन, श्री.प्रथमेश शहाणे, कुमार श्रीरंग जोगळेकर, श्री.उदय गोखले यांची साथ संगत रहाणार आहे. सर्व रसिक जनांनी वाचनालयाच्या या तथास्तु कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहून सुरेल गाणी आणि आठवणी यांचा आस्वाद घेत वाचनालयाच्या नवनिर्मितीच्या उपक्रमास सदिच्छा द्याव्यात असे आव्हान ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे.