- . *गोळप कट्टा* च्या ५१ व्या कार्यक्रमात यावेळी मान्यवर म्हणून रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड गावचे तीन जागतिक विक्रम केलेले रांगोळीकार श्री. राहुल कळंबटे ( मोबाईल.७३५०२१२४४०) होते. आपला जीवनप्रवास सांगताना…..माझे गाव मालगुंड .घरची परिस्थिती प्रचंड गरिबीची. आई बाबा मोलमजुरी करणारे. घरी शिक्षणाचे वातावरण पाहिजे तेवढे नव्हते. एक वेळेचे जेवण मिळताना मुश्किल अशी स्थिती होती. आठवी पासून चित्रकलेची आवड लागली . नववीत असताना शासकिय रेखाकला परिक्षेत “A” श्रेणीने पास झालो. २००५ मध्ये बळीराम परकर शाळेतून दहावी झालो . शाळेत असताना स्केचिंगची आवड होती. मुड असेल तर चित्र चांगली येत असत . दहावीनंतर नंतर करायचं काय हा प्रश्न होता. पण माझे कलाशिक्षक श्री दरवजकर सर यांनी मला चित्रकलेचे पुढील शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरी येथे पाठवले . रत्नागिरी स्कूल ऑफ आर्ट मध्ये एका वर्षाचा बेसिक कोर्स केला . पण हा कोर्स पूर्ण करताना कधी कधी साहित्याला पैसे पुरत नव्हते. शिवाय या कोर्सचा पुढे उपयोग होईल असे वाटेना. ते एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरातले म्हणाले शिक्षण आता बस झाले. पण मला शिकायची इच्छा होती. पण परिस्थिती इतकी गंभीर होती की काही सुचत नव्हते. तेव्हांपासून चे सर्व निर्णय माझे मिच घेत गेलो. त्यानंतर मी अकरावी मध्ये ऍडमिशन घेतले. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. बारावी नंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी दरम्यान त्याच काळात मोलमजुरी केली, चिऱ्यांची कामे केली . शिक्षणासाठी पैसे मिळवण्यासाठी पडेल ते काम केले. आंबा सीझन मध्ये रात्री दूसर्ऱ्यांकडे पेट्या जमवण्याचे काम केले . पुढील शिक्षणासाठी कोल्हापूर कलानिकेतन येथे ऍडमिशन करायचे ठरवले. पण घरून मला आवश्यक तेवढा पाठींबा नव्हता. घरच्यांच्या विरोधात जाऊन शिकायचे ठरवले होते .कधी कधी काही लोकांची नेहमी बोलणी ऐकावी लागत असे कशाला शिकतोस , कुठे आहेत नोकरी , वगैरे वगैरे. मी मनाला मात्र नेहमी हेच सांगण्याचा प्रयत्न करीत असे हेच वय आहे शिकण्याचे . शेवटी पुढे आपल्याला मोलमजुरीच करायची आहे. शेवटचा एक प्रयत्न करून बघुया. कोल्हापूर येथे पहिल्या मेरीट लिस्ट मध्ये नं. लागला आणि मी खूप आनंदीत होतो की आता आपल्याला कोल्हापूर सारख्या ठिकाणी शिकायला मिळणार. पण काही गोष्टी खूप विचित्र घडणार होत्या हे मला माहिती नव्हतं तिथे ऍडमिशन घेण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा माझ्याकडून जास्त पैशाची मागणी केली. पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते नियमाप्रमाणे फी कमी होते हे मला माहिती होतं. कारण माझ्या सोबत जबाबदारी व्यक्ती कोणीच नव्हते. कारण जे काही माझ्याकडे पैसे होते ते राहण्या- खाण्यापासूनचे तेवढेच पैसे होते. माझ्या शिक्षकांचा आग्रह होता तिथे तू शिकावे मात्र पैसे जास्त मागत असल्यामुळे मी प्रवेश रद्द केला. परत घरी आलो. प्रचंड रडलो. दोन दिवस काही सुचत नव्हते. तो क्षण अजूनही आठवतो मला वडीलांनी पहिल्यांदा मला मिठी मारून रडलेत. कारण त्यांनी माझी धडपड पाहिली होती . कारण त्या मिठीत ते सर्व काही कळत होतं . परत गावात पून्हा विविध ठिकाणी कामे करायला लागलो. दिवस प्रचंड कष्टात गेले. दिशा मिळत नव्हती. एकदा असेच आमच्या घराच्या ठिकाणी एक सर राहत होते त्यांनी मला त्यांचा प्रवास सांगितला त्यांच्या आयुष्यात आलेल्या अडचणीतून ते कसे पुढे गेले ते सांगितले. तु जे काम करत आहेस ते काम तुझे नाही आहे . त्यामुळे पुन्हा प्रयत्न कर. मग शेवटचा प्रयत्न म्हणून रत्नागिरी स्कूल ऑफ आर्ट येथे ऍडमिशन घेतले व कलाशिक्षक डिप्लोमा पूर्ण केला. ते करूनही कुठे नोकरी लागत नव्हती. दोन वर्ष बेकार होतो. पुन्हा मजुरी सुरू होती. २०१० मध्ये अंशकालीन भरती मध्ये कला शिक्षक म्हणून नगरपरिषद शाळेमध्ये ६ महिने कंत्राटी काम केले. शाळेत असताना संस्कार भारती रांगोळी काढायचो. पण व्यक्तिचित्र रांगोळीची काहीच कल्पना नव्हती. कशी काढायची कोणते रंग वापरायचे. ज्यावेळेस व्यक्तिगत रांगोळी शिकायची होती त्यावेळेस एका दिग्गज कलाकाराला भेटण्याचा प्रयत्न केला. मला रांगोळी शिकवण्यासाठी नकार दिला मी म्हणालो मला रांगोळी काढण्याची पद्धत तरी सांगा ते म्हणाले तूला जमणार नाही. पुन्हा निराशा. त्यानंतर मला प्रशांत राजीवले व राजू भाताडे यांसारखे रांगोळी कलाकार मिळाले. व त्यांच्यासोबत राहून रांगोळी काढायला लागलो. सर्वात प्रथम रांगोळी मी मालगुंड येथे नवरात्र उत्सव मध्ये काढली होती. तो ही देवीचा फोटो. बऱ्यापैकी ते काम लोकांना आवडलं. त्यानंतर मित्राने त्यांच्या लग्नात दोघांचे फोटो काढायला सांगितले होते. आणि ते काम सुद्धा लोकांना आवडलं. आणि तिथून रोजगार मिळण्याचे एक साधन निर्माण झालं. अशा रीतीने रांगोळीच्या ऑर्डर मिळत गेल्या. माझे मित्र मला नेहमीच म्हणायचे तुझं काम एवढं चांगलं आहे तू स्पर्धेमध्ये भाग का नाही घेत . तेव्हा माखजन येथे मी पहिल्यांदाच जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. कोणाला माझे नाव सुद्धा माहित नसताना माझा पहिला नंबर आला. त्यानंतर सांगलीला झालेली राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा. तेथे सर्व दिग्गज रांगोळी स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे माझं सिलेक्शन झालं नव्हतं. स्पर्धेच्या आदल्या दिवशी मला संधी मिळाल्याचा फोन आला. सर्व अडचणींवर मात करून गोणपाट वर झोपलेला मुलगा रांगोळी मध्ये साकारला होता. चोवीस तास रांगोळी काढायला लागले. अनेक दिग्गज रांगोळीकार असताना तिथे पहिला नंबर आला. ती रांगोळी प्रचंड प्रसिद्ध झाली. माझे नाव झाले. मग विविध ठिकाणी कामे मिळायला लागली अगदी वाढदिवस पासून ते लग्नापर्यंत रांगोळी काढायची कामे करायला लागलो. त्यातून पैसे मिळायला लागले. परिस्थिती थोडी सुधारली. खाजगी शाळेत नोकरी करता करता ही कामे करत असतो. मध्यंतरी माझ्या मित्राच्या मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी 3D रांगोळी काढली होती. लाल फ्रॉक घातलेली मुलगी 3D रांगोळी प्रचंड प्रसिद्ध झाली. त्यानंतर 3D रांगोळी मध्ये जागतिक विक्रम करण्याचे ठरवले. श्री गणरायाची जगातील सर्वात छोटी 3D रांगोळी काढून तीन जागतिक विक्रम केले. लहानपणी आपले नाव व्हावे, आपले होर्डिंग्ज लागावे असे वाटायचे. ते स्वप्न पालकमंत्री उदय सामंत आणि भय्या सामंत यांनी भरवलेल्या इंद्रधनू रांगोळी प्रदर्शन मध्ये पूर्ण झाले. तिथे एका बाजूने वाघ आणि दुसऱ्या बाजूने पाहिले की उदयजी सामंत अशी आव्हानात्मक रांगोळी काढली होती. ती खूप प्रसिद्ध झाली. दुसरे एक स्वप्न होते की आपले विचार कोणी ऐकावे आपल्याला कोणी बोलवावे ते स्वप्न गोळप कट्टा मुळे पूर्ण झाले. देवाच्या कृपेमुळे व ज्यांनी माझ्यावर नेहमी विश्वास ठेवला अशा प्रत्येक व्यक्तीच्या विश्र्वासामुळे आज इथपर्यंत पोचलो. समाधानी आहे. आपल्या क्षमतेवर विश्वास असायला हवा. निराशेच्या काळात कोणीतरी पाठीशी आणि दिशा देणारे असायला हवे. घरच्यांचा पाठींबा असायला हवा अन्यथा माणूस वाईट दिशा आणि व्यसनाकडे वळू शकतो .मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करायला द्या. गरजेला मी अनेकजणांना माझी परिस्थिती नसतानाही मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सध्या गरजवंत ओळखणे गरजेचे आहे. परिस्थिती कधीच वाईट नसते पण सोबत असणारी माणसे कधीच आपल्याला पुढे जाऊ देत नाही त्यामुळे परिस्थिती वाईट बनते. हे सर्व करत असताना एखादी चूक घडली म्हणून आयुष्य संपत नाही प्रयत्न करत राहणे हा एक उत्तम मार्ग आहे. आपलं काम उत्तम आणि प्रामाणिकपणे करा. ” प्रत्येक कलाकार व त्याच्या कलेचा सन्मान करा, कोणालाही कधी कमी लेखू नका, कारण कमी गुण असलेल्या लोकांमध्ये कधी बदल होईल सांगता येत नाही ” असे आलेल्या अनुभवातून त्यांनी सांगितले. याशिवाय अनेक किस्से, अनुभव, स्पर्धेमध्ये घडलेल्या अनेक गोष्टी, घरच्या प्रचंड गरिबीच्या मनाला भिडणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या. यानंतर त्यांचा सत्कार करून कार्यक्रम संपला. आता पुढील महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पुन्हा भेटू एका वेगळ्या व्यक्तीबरोबर…..अविनाश काळे ९४२२३७२२१२ *Video गोळप कट्टा फेसबुक पेज ला पाहता येईल. पेज follow आणि like करा* पेज लिंक https://www.facebook.com/profile.php?id=100064188098707&mibextid=ZbWKwLwww.konkantoday.com
Back to top button