
शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर तब्बल तीसहून अधिक ठाशीव, सुस्पष्ट कातळशिल्पांचा समूह आढळला
रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या सड्ये येथील तरुणांनी सलग तिसर्या वर्षी नरकचतुर्दशी दिवशी कातळशिल्प शोधयात्रा काढली. शोधयात्रेतून सडये-वाडाजूनच्या सड्यावर थोडाथोडका नव्हे, तर तब्बल तीसहून अधिक ठाशीव, सुस्पष्ट कातळशिल्पांचा समूह आढळून आला. छोटी, मध्यम आणि मोठी अशी एकूण 10 रेड्यांची पावलं, 10 मानवाची पावलं आढळून आली आहेत, तर 2 मोठ्या चाव्याकृती आकृत्या, 2 प्राणी, 1 मडके अशी 30 चित्रे आढळली आहेत.
सड्येतील तरुण मंडळी दरवर्षी दिवाळीनिमित्त पदयात्रा काढत असतात. यावर्षीची पदयात्रा वाडाजून सड्यावरील ‘रेडेबावलं’ या गूढ कथांनी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी गेली होती. बारा रेड्यांची जोतं आणि बारा माणसांच्या दुर्घटनेच्या कथित दुर्घटनेच्या ठिकाणी जाऊन या तरुणांनी सर्व अंधश्रद्धांना मूठमाती देण्याचा प्रयत्न या यात्रेनिमित्त केला. सकाळी 9 वा. सडये देवस्थान येथून ही पदयात्रा सुरू झाली.यावेळी या शोधयात्रेचे संस्थापक सदस्य आणि वाटाडेे म्हणून काम पाहणारे सुरेश ऊर्फ आप्पा धुमक यांना श्रद्धाजंली वाहून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावर्षीच्या पदयात्रेचे मार्गदर्शन सड्येे-पिरंदवणे-वाडाजून परिसराची इत्यंभूत माहिती असणारे आत्माराम धुमक यांनी केले. रानवाटा, गावांच्या सीमारेषा, जमीन मोजणीच्या जुन्या ऐरणी, रानटी औषधी झाडे आणि त्यांचे उपयोग, प्राचीन बांधीव घाट्या, कातळशिल्पे आणि त्यामागच्या दंतकथा याबाबत सार्या प्रवासात ओघवती माहिती दिली.
पदयात्रा यशस्वी करण्यासाठी पदयात्रेचे संकल्पक अनंत धुमक, अमोल पालये, मारुती धुमक यांनी मेहनत घेतली. पदयात्रेत सुरज माने, निखिल पालये, रोशनी पालये, तेजस्विनी पालये, वेदिका तांबे, तनिष्क लोखंडे, आत्माराम धुमक आदी सहभागी झाले होते.
www.konkantoday.com