
ठाणे, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांसहराज्यातील १९ जिल्हा रुग्णालयांमध्ये लवकरच कॅथ लॅब सुरू होणार
हृदयविकाराच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानेही उपचारासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील १९ जिल्हा रुग्णालयांमध्ये लवकरच कॅथ लॅब सुरू होणार आहे.यासाठी आरोग्य विभागाने वर्क ऑर्डरही तयार केली आहे. ही कॅथलॅब आरोग्य विभागामार्फतच चालविली जाईल परंतु आवश्यक सीटी आणि एमआरआय स्कॅनसाठी प्रत्येक रुग्णालयात खासगी भागीदारीतून केंद्रे उभारली जातील.
राज्याचा आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयांमध्ये सुपर स्पेशालिस्ट सेवा सुरू करण्यावर भर देत आहे. रूग्णांना हृदयासंबंधी सेवा तात्काळ मिळाव्यात, यासाठी कॅथलॅब वाढवण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, पुणे, अहमदनगर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कॅथ लॅब सुरू करण्यात येणार आहेत. रूग्णांना सुपर स्पेशालिटी सुविधांसह घरापासून जवळच तत्काळ उपचार मिळवून देण्याचा आरोग्य विभागाचा प्रयत्न आहे.
राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार म्हणाले की, कॅथलॅबची स्थापना हा एसटी एलिव्हेशन मायोकार्डियल इन्फेक्शन प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही कॅथलॅब सुरू झाल्याने हृदयरोग्यांना गोल्डन अवरमध्ये जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार घेता येणार आहेत. हृदयविकाराच्या झटक्याचे रुग्ण प्राथमिक आणि ग्रामीण रुग्णालयातून सरकारी किंवा खासगी रुग्णालयात पाठवले जातात. राज्यात आधीच २० हून अधिक सुपर स्पेशालिटी रुग्णालये आहेत. जिथे अँजिओप्लास्टी केली जाते. परंतु, जिल्हा रुग्णालयांमध्ये ॲजिओप्लास्टीची विशेष सेवा नसल्याने कॅथलॅब सुरू करण्यात येणार आहेत.
स्टेमी प्रकल्पांतर्गत राज्याने एका खासगी कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीने सार्वजनिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टर आणि परिचारिकांना छातीत दुखत असलेल्या रुग्णांसाठी ईसीजी काढण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. २०२१ ते २०२२ या कालावधीत स्टेमी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या ५ लाख ईसीजी पैकी ४ हजार ३२९ रुग्णांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले आणि त्यांना उपचारासाठी प्रमुख रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. २०२३ -२४ या आर्थिक वर्षात आरोग्य विभागाने ७ लाख लोकांचे ईसीजी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
www.konkantoday.com




