
रत्नागिरीतील पोलिस कर्मचाऱ्यांची चमकदार कामगिरी
रत्नागिरी पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारांनी 33 व्या महाराष्ट्र राज्य, पोलिस क्रीडा स्पर्धेत पुणे येथे सोनेरी कामगिरी केली. यात महिला पोलिस स्पर्धकांनी वैयक्तिक कामगिरीत एकूण 7 सुवर्ण तसेच 3 कांस्य पदके प्राप्त केली. सांघिक स्पर्धेमध्ये कोकण परिक्षेत्रामधून 1 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक प्राप्त केले.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी पोलिस दलातील महिला पोलिस काँस्टेबल मंजिरी रेवाळे यांनी 3 सुवर्ण पदके प्राप्त करून सर्व स्पर्धकांमध्ये सरस ठरत ‘बेस्ट अॅथलेटिक्स प्लेअर अॅवॉर्ड 2023’ प्राप्त करून रत्नागिरी पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
महिलांमध्ये मंजिरी रेवाळे यांनी अॅथलेटिक्स, धावणे 100 मीटर, लांब उडी, 100 मीटर रीलेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. 200 आणि 400 मी. धावणेमध्ये पोलिस काँस्टेबल अमृता वडाम हिने प्रथम क्रमांक पटकावला. धावणे 100 मीटर हर्डल्स आणि उंच उडीमध्ये पोलिस काँस्टेबल शितल पिंजरे हिने प्रथम क्रमांक मिळवला.
याचबरोबर 57 किलो वजनी गटात तेजस्विनी जाधव तृतीय क्रमांक, 55 किलो वजनी गटात पूजा गायकवाड तृतीय क्रमांक, 75 किलो पुरुष वजनी गटात तृतीय क्रमांक पोलिस काँस्टेबल बालाजी धेंम्बरे, 110 मिटर हर्डल्स पुरुष गटात तृतीय क्रमांक रोहित मांगले यांनी बाजी मारली.
सांघिक कामगिरीमध्ये कोकण परिक्षेत्रामध्ये खेळताना कबड्डी पुरूष संघाकरिता 1 सुवर्णपदक व खो-खो महिला संघाकरिता 1 कांस्यपदके प्राप्त केली.