
कोकणातील साखरप्याला गवसला पुरापासून मुक्तीचा मार्ग
पश्चिम घाटातून वाहत कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे येणारी काजळी नदी पावसाळ्यात आपत्ती घेऊन येते ,संपूर्ण बाजारपेठ आणि रहिवासी भाग पुरात जातो.पण या वर्षी हे घडलेच नाही. साखरपा पुरापासून वाचले !
याला कारण गावकऱ्यांनी नदीतील गाळमुक्तीचा निश्चय केला.दगड गोट्यांच्या स्वरूपात येणाऱ्या गाळाने निर्माण झालेल्या उथळपणाने पुराच्या छायेत असलेल्या साखरप्यातील काजळी नदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
साखरपा या गावातून वाहणारी नदी काजळी ही आहे. चिपळूणच्या वशिष्ठी नदी एवढा विस्तार नाही. पण अत्यंत वेगाने पश्चिम घाटातुन आंबा घाटातून वाहत येते आणि वेगाने जाऊन ते रत्नागिरीच्या समुद्राला मिळते.
वरून मोठे नर्मदेतले गोट्या सारखे गोटे येतात गाळाच्या स्वरूपामध्ये आणि त्यांनी नदीचे पात्र उंचावले.
या नदीच्या दोन्ही बाजूला गाव आणि बाजारपेठ आहे ,उथळ झालेल्या पात्रामुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता . मागील काही वर्षापूर्वी म्हणजे 2005 च्या पुरात गावचे खूप हाल झाले. 2019 साली गावच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रश्नावर तोडगा काढता येईल का याची चर्चा केली . यासाठी जलनायक डॉक्टर अजित गोखले यांचेशी संपर्क साधला.नदीचा शास्त्रीय अभ्यास केला. आणि नेमके काय काम करायचे हे निश्चित केले.त्याची दिशाही ठरली.नाम फौंडेशन ने विनामूल्य यंत्र(पोकलेन) उपलब्ध करून दिले आणि गावकऱ्यांनी इंधनाचा खर्च केला.
लोकसहभागातून काही निधी उभारला , पण १२ लाखाचे कर्ज देखील या कामासाठी घ्यायला लागले.असे एकूण ३५ लाख रुपये खर्च आला . १ किलोमीटर परिसरात नदीचे पात्र खोल करून गाळ काढण्यात आला . खोली ४ मीटर करण्यात आली . पात्र दीडशे फूट रुंद करण्यात आले. मुग्धा सरदेशपांडे ,प्रसाद सरदेशपांडे ,गिरीश सरदेशपांडे ,श्रीधर कबनुरकर तसेच नाम फाउंडेशन च्या सहकार्याने गावकऱ्यांनी हे आव्हान पेलले . कोविड, लॉकडाऊन सारखे अनेक अडथळे पार करून गाव इथपर्यंत पोचले आहे . अजून ४ वर्ष काम करीत राहावे लागणार आहे.
मे अखेर काम संपलं पण त्या कामाने देखील आज साखरपा या गावाला पुराची दाहकता तेवढे जाणवली नाही . म्हणजे थोडक्यात स्थानिक स्तरावरील लोकांनी पुढाकार घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन समाजाचे सहकार्य घेऊन काम केल्यास बदल निश्चित घडतो,असे जलसाक्षरता केंद्र यशदाचे माजी कार्यकारी संचालक डॉ सुमंत पांडे यांनी सांगितले .
डॉ अजित गोखले(संस्थापक,नॅचरल सोल्युशन्स ) म्हणाले,’कोकणातील ‘हाय फॉल रेन एरिया’ मध्ये काम करताना ‘नाम फौडेशन’ ला आम्ही तांत्रिक सल्ला देतो. साखरपा प्रकल्पात आमच्या’नॅचरल सोल्युशन्स’ टीमने तेच केले. कोकणात ७० वर्षातील वृक्ष तोडीने नद्यात गाळ साठला आहे. त्या उथळ झाल्या आहेत.नद्या आता २०० फुट रुंद झाल्या आहेत. त्यामुळे पूर गावात येत आहेत. साखरप्यात हेच होत होते.साखरप्याचे सर्वेक्षण करून आराखडा केला,गावकऱ्यांनी काम केले.आणि पूर गावात यायचा थांबला.कोकणात पावसाच्या पाण्याला वाहायला जागा केली पाहिजे,पावसाळ्यानंतर पाणी अडवायला सुरुवात केली पाहिजे. इतर ठिकाणचे जलसंधारणाचे तंत्र कोकणात चालणार नाही,कोकणसाठी वेगळा विचार आणि तंत्र वापरले पाहिजे’.
आता नुकताच वशिष्ठी नदीने आपल्या प्रकोपचे दर्शन घडवले आहे आणि चिपळूण शहरात आठ फूट उंच पाणी होतं त्यामुळे झालेली वित्त आणि मनुष्य हानी खूप दुःखद आहे.पण साखरप्याच्या गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे.
कोकणातील अनेक नद्यांसाठी हा आशेचा किरण नक्कीच आहे.
www.konkantoday.com
