
कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी जिल्ह्यातील 3 संस्थांची नावे घोषित
रत्नागिरी दि. २७ : कोविडच्या संसर्गामुळे आईवडिल दोघांचेही निधन झाल्यावर त्यांच्यावर अवलंबुन असलेल्या बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याने अशा बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरीय कृतीदल (Task Force) स्थापन करण्यात आले आहे. तसेच कोविड प्रादुर्भावाच्या काळात जिल्हयातील बालकांची काळजी व संरक्षणाच्या काम करणाऱ्या संस्थामधील बालकांना तसेच कोविडमुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. कोविड आजारामुळे दोन्ही | पालक गमावलेल्या बालकांना सर्वोतोपरी संरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे तसेच बालकाला त्यांचे कायदेशिर हक्क मिळवून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत. कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांकरीता जिल्हयातील ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता कै. ना.प.अभ्यंकर निरीक्षणगृह-बालगृह रत्नागिरी, ० ते १८ वयोगटातील मुलींकरीता कै.जानकीबाई आक्का तेंडुलकर महिलाश्रम संचलित मुंलीचे निरीक्षणगृह-बालगृह, लांजा व ० ते ६ वयोगटातील मुलांकरीता भारतीय समाज सेवा केंद्र,चिपळूण (शिशुगृह) या ३ संस्था घोषित करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास *चाईल्ड हेल्पलाईन१०९८*, सेव्ह द चिल्ड्रन्स-७४५३०१५५१८,८३०८९९२२२, अध्यक्ष, बाल कल्याण समिती-९८२२९८३६२०, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी -९२२५८९२३२५, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय - ०२३५२-२२०४६१ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात येत आहे. या कृती दलाचे अध्यक्ष .जिल्हाधिकारी असून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
www.konkantoday.com