चिपळूण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; ‘कोटींच्या कोटी उड्डाणे’ झाली तरी शासन पाठीशी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत


रत्नागिरी, दि. १३ ) : “चिपळूणच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही; विकासाच्या कामांसाठी प्रस्तावांची ‘कोटींच्या कोटी उड्डाणे’ झाली, तरी पालकमंत्री म्हणून एकही रुपया कमी पडू न देण्याची जबाबदारी माझी असेल,” अशी ठाम ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज दिली.
वैशिष्ट्यपूर्ण अनुदान योजना (सन २०२५-२६) अंतर्गत चिपळूण नगरपरिषदेच्या नवीन आणि सुसज्ज प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते आज पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमास आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, माजी आमदार रमेश कदम, सदानंद चव्हाण, संजय कदम, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर आदी उपस्थित होते.
शहराच्या विकासासाठी केवळ जिल्हा नियोजन मंडळावर (DPC) अवलंबून न राहता, ‘राज्य नगरोत्थान’ योजनेच्या माध्यमातून चिपळूणला मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला जाईल, असे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले.
चिपळूण शहरासाठी आधुनिक ड्रेनेज सिस्टीम उभारणे, नानासाहेब जोशी यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या १५.५० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी रस्त्याचा प्रश्न एकाच वेळी मार्गी लावला जाईल. सवतसडा धबधबा परिसराच्या पर्यटनाचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून आणि वाशिष्ठी नदीकाठचा विकास करून चिपळूणला पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनवले जाईल. पारदर्शक आणि दर्जेदार डीपीआर (DPR) तयार केल्यास निधी मंजूर करण्याची पूर्ण जबाबदारी आपली असेल, असे ते म्हणाले.
सफाई कामगारांच्या गणवेश, बूट आणि आधुनिक साधनांसाठी जिल्हा नियोजन मंडळातून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाईल.
७० वर्षे टिकणारी दर्जेदार प्रशासकीय वास्तू
नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले, ही वास्तू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अत्यंत दर्जेदार बांधली जाईल, जी पुढील किमान ७० वर्षे भक्कमपणे उभी राहील. रत्नागिरी नगरपालिकेच्या इमारतीप्रमाणेच ही वास्तूही राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विकासासाठी ‘सर्वपक्षीय एकजूट’ हाच एकमेव पक्ष
व्यासपीठावर आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम यांच्यासह विविध पक्षांचे नेते एकत्र आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “राजकीय मतभेद जरूर असावेत, त्यातूनच विकासाला चालना मिळते. मात्र, शहराच्या विकासाचा प्रश्न येतो, तेव्हा सर्व पक्ष बाजूला ठेवून ‘विकास हाच पक्ष’ मानून एकत्र येण्याचा चिपळूणचा हा आदर्श संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
सुरक्षित चिपळूणसाठी स्वतंत्र आपत्ती निवारण पथक
चिपळूणची पूर परिस्थिती लक्षात घेता, एसडीआरएफच्या (SDRF) धर्तीवर चिपळूण आणि रत्नागिरी नगरपालिकेसाठी २५ प्रशिक्षित जवानांचे स्वतंत्र ‘आपत्ती निवारण पथक’ (स्कॉड) तयार केले जाणार आहे. या जवानांचे प्रशिक्षण ‘सिंधुरत्न’ योजनेतून आणि मानधन ‘सीएसआर’ (CSR) निधीतून दिले जाईल, तसेच चिपळूणकरांच्या जिव्हाळ्याच्या पूररेषेच्या (ब्लू आणि रेड लाईन) प्रश्नावरही शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
विकासकामांत कधीही राजकारण आणले नाही – आमदार भास्कर जाधव
“माझ्या ४४ वर्षांच्या दीर्घकालीन राजकीय कारकिर्दीत मी कधीही कोणाच्याही विकासकामाला विरोध केला नाही. काम कोणाचेही असो, ते जनतेचे असते, या भावनेतून मी नेहमीच विकासाच्या बाजूने उभा राहिलो आहे,” असे आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
चिपळूणच्या पर्यटन विकासाबाबत बोलताना त्यांनी सवतसडा धबधबा बारमाही सुरू ठेवण्यासाठी परशुराम तलावातून पाणी आणण्याची योजना आणि गोवळकोट ते परशुराम केबल कार प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचे आवाहन केले.
“राजकीय मतभेद हे वैचारिक असावेत, व्यक्तिगत नसावेत. चिपळूण शहराच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेते, आर्किटेक्ट आणि अभियंत्यांना एकत्र घेऊन सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. शहराच्या विकासासाठी राजकारण विरहित पूर्ण सहकार्य केले जाईल,” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
चिपळूण नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त १५० कोटी अतिरिक्त निधी द्यावा : आमदार शेखर निकम
चिपळूण नगर परिषदेला लवकरच १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक टप्प्याचे औचित्य साधून नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या कारकिर्दीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने १५० कोटी अतिरिक्त निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी केली.
रत्नागिरी नगर परिषदेची इमारत पाहिली असून, त्या इमारतीच्या निम्मा हिस्सा जरी चिपळूणला मिळाला तरी आमचे बरेचसे काम मार्गी लागेल, अशी मिश्कील आणि मार्मिक विनंती पालकमंत्र्यांना केली.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीचे शासन प्रभावी काम करत आहे. पालकमंत्री उदय सामंत हे राज्याचे एक प्रभावी नेतृत्व असल्याने त्यांच्याकडे वेगळे काही मागण्याची गरज भासत नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी आमदार निकम यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, अजितदादांनी चिपळूण शहराच्या विकासासाठी वेळोवेळी ५० ते ६० कोटी रुपयांचा निधी दिला होता. मुरादपूरचा पूल, पवन तलाव सुशोभीकरण, गोवळकोट मैदान आणि शहरातील गाळ काढण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दादांची मोठी साथ मिळाली. आज ते असते तर शहराच्या विकासात मोठी भर पडली असती. मात्र, सध्याचे राज्य नेतृत्व देखील चिपळूणला भरघोस निधी देऊन प्रलंबित प्रश्न निश्चितपणे सोडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास नगरसेवक, नगरसेविका, आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि चिपळूणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button