मार्लेश्वर येथे डोंगरावरून कोसळलेल्या दगडाने सहा वर्षीय बालिकेचा मृत्यू


वडील व काकाही जखमी; दर्शनासाठी आलेल्या पाटील कुटुंबावर काळाचा घाला


देवरुख जवळील मार्लेश्वर तीर्थक्षेत्रात दर्शनासाठी आलेल्या ईश्वरपूर येथील सहा वर्षीय बालिकेच्या डोक्यावर डोंगरावरून कोसळलेला दगड आदळल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. १३) दुपारी बाराच्या सुमारास धारेश्वर परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत बालिकेचे वडील आणि काकाही जखमी झाले आहेत. ऋत्वी संदीप पाटील असे मृत बालिकेचे नाव आहे. या घटनेने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ईश्वरपूरमधील कापूसखेड येथील पाटील कुटुंबातील आठ जण शुक्रवारी सकाळी मार्लेश्वर व गणपतीपुळे दर्शनासाठी घरातून निघाले होते. मार्लेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर कुटुंबीय धारेश्वर धबधब्याकडे गेले. तेथे नदीतील पाण्यात हातपाय धुतल्यानंतर लहान मुलांनी पाण्यात खेळण्याचा आनंद घेतला. त्यानंतर सर्वजण देवस्थान परिसराकडे परतत होते.

नदी पार करून परतत असताना दुपारी बाराच्या सुमारास अचानक डोंगरावरून तीन मोठे दगड वेगाने खाली कोसळले. यातील एक दगड थेट ऋत्वीच्या डोक्यावर आदळला. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आणि तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. दुसरा दगड तिचे वडील संदीप पाटील यांच्या पायावर पडल्याने ते जखमी झाले, तर तिसरा दगड ऋत्वीच्या काका यांच्या हाताला व तोंडाला लागल्याने तेही जखमी झाले.

रक्तबंबाळ अवस्थेतील ऋत्वीला कुटुंबीयांनी तातडीने निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला देवरुख ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांनी ऋत्वीला मृत घोषित केले. तिचे वडील संदीप पाटील यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सुरुंगस्फोटांमुळे डोंगराला भेगा पडल्याचा ग्रामस्थांचा दावा

दरम्यान, मार्लेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरुंग लावले जात असल्याने डोंगराळ भागात भेगा पडत असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे डोंगरावरून दगड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वीही या परिसरात अशा प्रकारच्या दोन घटना घडल्या असून, दगड कोसळण्याची ही तिसरी घटना असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, यावेळी या दुर्घटनेत अवघ्या सहा वर्षांच्या ऋत्वीला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मार्लेश्वरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात भाविकांची मोठी गर्दी होत असताना डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी आता भाविक आणि स्थानिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button