जिल्ह्यात १२ ते १८ नोव्हेंबर ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह २०२६’ ; विविध लोकोपयोगी उपक्रम


रत्नागिरी, दि. १० ): क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १२ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसह जल-जंगल-जमिनीच्या संरक्षणासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यात दिलेले योगदान अतुलनीय असून, त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आठवडाभर विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे.
१३ नोव्हेंबर (योजना व लाभ वाटप दिवस): धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JGUA), पीएम जनमन योजना (PM JANMAN) आणि महिला बचत गटांच्या पात्र लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, नवीन अर्जांचा स्वीकार तसेच स्वयंरोजगार व शेतीपूरक व्यवसायाबाबत मार्गदर्शन शिबिर होईल.
१४ नोव्हेंबर (स्वच्छता व दीपोत्सव): आदिवासी स्मारके व सार्वजनिक ठिकाणच्या पुतळ्यांची स्वच्छता केली जाईल. सायंकाळी सर्व आदिवासी स्मारके व सार्वजनिक ठिकाणी दीपोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असेल.
१५ नोव्हेंबर (क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती – मुख्य दिन): जिल्हा व तालुका स्तरावर भगवान बिरसा मुंडा व स्थानिक आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल. तसेच पद्म पुरस्कार प्राप्त, ‘मन की बात’मध्ये उल्लेख झालेले व सामाजिक क्षेत्रातील आदिवासी विभूतींचा सत्कार करण्यात येईल आणि चौक, रस्ते व उद्यानांना महापुरुषांची नावे देण्याबाबत कार्यवाही केली जाईल.
१६ नोव्हेंबर (आधार व कागदपत्र सेवा शिबिर): आधार कार्ड दुरुस्ती व अद्ययावतीकरण, वनपट्टेधारकांना लाभ वाटप, पीकविमा व कृषी योजनांच्या सेवा पुरवण्यासाठी विशेष शिबिरे भरवण्यात येतील.
१७ नोव्हेंबर (आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर): रक्तदाब, मधुमेह व सिकलसेल तपासणी शिबिरे, तसेच माता-बाल संगोपन व पोषण आहाराबाबत जनजागृती कार्यक्रम राबवले जातील.
१८ नोव्हेंबर (आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस – सप्ताह समारोप): आदिवासी महिला बचत गट आणि युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, अप्रेंटिसशिप, स्वयंरोजगार, बँक खाती व शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शन व नोंदणी शिबिरासह सेवा सप्ताहाचा समारोप होईल.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या निर्देशानुसार या संपूर्ण सप्ताहाच्या समन्वयाची जबाबदारी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे नोडल विभाग म्हणून सोपवण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व संबंधित यंत्रणा प्रमुखांनी आपापल्या स्तरावर सुयोग्य नियोजन करून हा सप्ताह यशस्वीरीत्या पार पाडावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button