दिवाळीतच खेर्डीवासीयांना पाणीटंचाईचा फटका; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत

गाळ उपशाच्या कामामुळे जॅकवेलकडे जाणारा पाण्याचा प्रवाह वळवला; पंचायत समिती सदस्य विनोद भुरण यांची घटनास्थळी धाव

चिपळूण : दिवाळीच्या सणासुदीतच चिपळूण शहराचे उपनगर असलेल्या खेर्डीमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात नळाला पाणी येत नसल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने घरगुती कामांसह दैनंदिन गरजांसाठी पाण्याची व्यवस्था करताना नागरिकांची दमछाक होत आहे.

खेर्डी परिसरात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्या जॅकवेलकडे जाणारा पाण्याचा प्रवाह अडवून त्याचा मार्ग बदलण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर वीज निर्मिती बंद असल्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी, खेर्डी ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेला आवश्यक पाणी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

या पाणीटंचाईची माहिती मिळताच माजी सरपंच तथा पंचायत समिती सदस्य विनोद भुरण यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाळ काढण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून जॅकवेलकडे जाणारा पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नेमक्या कोणत्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, याचीही त्यांनी पाहणी केली.

दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणात सलग पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहिल्याने खेर्डीवासीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गाळ काढण्याचे काम आणि पाणीपुरवठा योजना यांचा समन्वय साधून जॅकवेलकडे पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button