
ससाळे परिसरात गव्यांचा मुक्तसंचार; काजू बागांचे मोठे नुकसान
गावाच्या मध्यवर्ती भागातही गव्यांचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, नुकसानभरपाईची मागणी
राजापूर : तालुक्यातील ससाळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचा मुक्तसंचार सुरू असून, गावाच्या मध्यवर्ती भागातही सकाळच्या वेळी गव्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतातील पिकांसह काजू कलमांच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकरी चिंतेत पडले आहेत.
ससाळे गावातील लोकवस्तीच्या आसपास तसेच गावाच्या मध्यवर्ती भागात गव्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गावाच्या मध्यवर्ती भागातील श्री गांगेश्वर मंदिरासमोरील रस्त्यावर गव्यांचा कळप फिरताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. मानवी वस्तीच्या अगदी जवळ गवे येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गव्यांचा वावर वाढल्याने शेतात जाणे, शेतीची कामे करणे तसेच परिसरातून ये-जा करणे ग्रामस्थांसाठी धोकादायक बनले आहे. अचानक गव्यांचा सामना झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, गव्यांनी परिसरातील काजू कलमांच्या बागांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. पांडुरंग शिवगण यांच्या काजू बागेसह अन्य ग्रामस्थांच्या काजू बागांनाही गव्यांच्या उपद्रवाचा फटका बसला आहे. आधीच विविध नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय अडचणीत असताना वन्यप्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
या प्रकाराची वनविभागाने गांभीर्याने दखल घेऊन ससाळे परिसराची प्रत्यक्ष पाहणी करावी. गव्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यांचा मानवी वस्तीत होणारा वावर कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. तसेच पांडुरंग शिवगण यांनी आपल्या काजू बागेच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा आणि नियमानुसार नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी वनविभाग व कृषी विभागाकडे केली आहे.




