
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केरावळे व मारवेलवाडीत वनराई बंधारे
देवाचे गोठणे व धाऊलवल्ली ग्रामस्थांचा पुढाकार; वहाळावर कायमस्वरूपी सिमेंट बंधारे बांधण्याची मागणी.
राजापूर : भविष्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देवाचे गोठणे येथील केरावळे व धाऊलवल्ली येथील मारवेलवाडी या दोन्ही वाड्यांतील ग्रामस्थांनी एकत्रित पुढाकार घेत वहाळावर वनराई बंधारे बांधले आहेत. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहिमेंतर्गत ग्रामस्थांनी श्रमदानातून हा उपक्रम राबविला.
या उपक्रमासाठी ग्रामपंचायत देवाचे गोठणे यांच्याकडून प्लास्टिकच्या पिशव्या व प्लास्टिक कागद उपलब्ध करून देण्यात आले. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण व्हावा आणि उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
दरम्यान, यापूर्वी या वहाळावर बांधण्यात आलेले बंधारे पुराच्या पाण्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही वाड्यांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, संबंधित वहाळावर शासनाच्या विविध योजनांमधून कायमस्वरूपी सिमेंट बंधारे बांधण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत देवाचे गोठणे आणि ग्रामपंचायत धाऊलवल्ली यांच्याकडे केली आहे.
तात्पुरत्या उपाययोजनांबरोबरच भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन शासकीय स्तरावर पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.




