१० वी व १२ वी खासगी विद्यार्थ्यांसाठी ‘फॉर्म १७’ भरण्यास १८ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढफेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी अतिविलंब शुल्कासह नावनोंदणीची संधीकोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनिता गुरव यांचे आवाहन


*रत्नागिरी, दि. ६ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी खाजगीरीत्या प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘फॉर्म नं. १७’ भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी अतिविलंब शुल्कासह बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतील, अशी माहिती कोकण विभागीय मंडळाच्या विभागीय सचिव पुनिता गुरव यांनी दिली आहे.
इ. १० वी व १२ वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांकरिता मंडळाच्या अटी व शर्तीनुसार सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये नावनोंदणीसाठी उपलब्ध आहेत. यासंदर्भातील सर्व माहिती व मार्गदर्शक पुस्तिका मंडळाच्या अधिकृत http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी अर्ज व शुल्क भरल्यानंतर मूळ अर्ज, शुल्क भरल्याच्या पोहोचपावतीच्या दोन छायाप्रती आणि मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • केवळ ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार : खासगी विद्यार्थ्यांनी इ. १० वी व १२ वी साठी नावनोंदणी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरावयाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • आवश्यक कागदपत्रे : ऑनलाईन अर्ज भरताना १) शाळा सोडल्याचा मूळ दाखला (नसल्यास द्वितीय प्रत व प्रतिज्ञापत्र), २) आधार कार्ड, ३) स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्कॅन करून अपलोड करावा लागेल.
  • नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) : पात्र विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र ऑनलाईन दिले जाईल.
  • परीक्षेचे आवेदनपत्र भरणे बंधनकारक : नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत नियमित परीक्षा शुल्कासह परीक्षेचे मुख्य आवेदनपत्र भरणे अनिवार्य आहे. त्यानंतर छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे संबंधित शाळेतून किंवा महाविद्यालयातून परत घ्यावीत.
  • अंतिम संधी : फेब्रुवारी-मार्च २०२७ च्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून अर्ज सादर करण्याची ही शेवटची संधी असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button