
केळशीतील संयुक्त बँक खात्यातून ३.९९ लाख रुपये लंपास!___
अज्ञात सायबर भामट्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दापोली तालुक्यातील केळशी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील संयुक्त बचत खात्यातून अज्ञात सायबर भामट्याने तब्बल ३ लाख ९९ हजार २२९ रुपये ७१ पैसे परस्पर हस्तांतरित केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ऑनलाइन आर्थिक फसवणूक प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
याबाबत शैलेश गणपत सावंत (वय ४६, सध्या रा. शिवडी, मुंबई; मूळ रा. कांदेवाडी, केळशी, ता. दापोली) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सावंत यांचे बँक ऑफ इंडियाच्या केळशी शाखेत संयुक्त बचत खाते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ ते २२ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अज्ञात व्यक्तीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शन आयडींचा वापर करून त्यांच्या संयुक्त बचत खात्यातील ३ लाख ९९ हजार २२९ रुपये ७१ पैसे परस्पर दुसरीकडे हस्तांतरित केले. खात्यातील रक्कम अशा प्रकारे काढून घेतल्याने सावंत यांना आर्थिक फटका बसला.
आपल्या बँक खात्यातून परस्पर रक्कम हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल
या तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्यातील रक्कम नेमकी कोणत्या माध्यमातून आणि कोणाच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत.
ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, ओटीपी किंवा गोपनीय तपशील देऊ नयेत, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत आहे.



