
ओणी कोंडिवळे येथे घरफोडी; सोन्या-चांदीचे दागिने लंपास शेट्ये यांच्या घरातून १ लाख ८ हजारांचा ऐवज चोरीस; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
राजापूर : तालुक्यातील ओणी कोंडिवळे येथील गोतावडे वाडीमध्ये घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी घडली. शामसुंदर गजानन शेट्ये यांच्या राहत्या घरात झालेल्या या चोरीत अज्ञात चोरट्याने एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ ते रात्री ९.४५ या वेळेत शेट्ये यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्याने घराच्या मागील दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या ऐवजात ८७ हजार ७६५ रुपये किमतीचे १२.८५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच २१ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख ८ हजार ७६५ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) आणि ३३१(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.




