दापोली तालुक्यात दोन दिवसांत 823 साखळी बंधाऱ्यांची उभारणी


दापोलीः- भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती दापोलीच्या वतीने राबविण्यात आलेल्या मिशन बंधारे-एक दिवस बंधाऱ्यासाठी, या उपक्रमाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसहभागातून तालुक्यात जवळपास 823 साखळी बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली.
रत्नागिरी जिल्ह्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकील उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत आणि राज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांना गती देण्यात आली. पंचायत समिती दापोलीचे सभापती उन्मेष राजे आणि गटविकास अधिकारी गणेश मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान 20 साखळी बंधारे बांधण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले होते. या कामासाठी विविध तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या मोहिमेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामस्थांनी श्रमदानातून सहभाग घेतला. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून बंधारे उभारणीच्या कामाला गती मिळाली. साखळी बंधाऱ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविणे, जमिनीतील ओलावा टिकविणे आणि भूजल पुनर्भरणाला मदत होण्याची अपेक्षा आहे. दोन दिवसांत 823 बंधारे उभारण्यात आले असून, काही ठिकाणी पुढील काळातही बंधारे बांधण्याचे काम सुरू राहणार आहे. संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वाच जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दापोली तालुक्यात पाणी संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळाले आहे. उभारलेल्या बंधाऱ्यांची योग्य देखभाल आणि वापर केल्यास भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button