महायुतीतील बेबंदशाहीला ‘गोकुळ’मधून चाप!

कोल्हापूर : दख्खनच्या ऐतिहासिक आणि स्वाभिमानी भूमीवर राजकीय ईर्ष्येचा धुमाकूळ माजविणाऱ्या ‘गोकुळ’ दूध संघाचा मतसंग्राम अखेर एका अभूतपूर्व वळणावर येऊन थांबला आहे. सत्तेची अफाट ताकद, साम-दाम-दंड-भेदाचे राजकारण, वचनांची खैरात आणि देवदेवतांच्या शपथांचे मोहजाळ या महायुतीच्या अस्त्रांना धुडकावून लावत ठरावधारकांनी आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीच्या पाठीशी भक्कम वज्रमूठ उभी केली. परिणामी, विरोधकांचा अहंकार धुळीस मिळवत गोकुळच्या पटलावर समविचारी आघाडीची ‘शिट्टी’ गर्जना करत घुमली!

सहकारातील सहा दशकांची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या गोकुळच्या या निवडणुकीत महायुतीने महाकाय तटबंदी उभारली होती. तीन मंत्री, दोन खासदार, दहा आमदार, पाच माजी आमदार आणि थेट मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने सजलेले तगडे सैन्य एका बाजूला, तर दुसरीकडे एकाकी झुंज देणारे निष्ठावंत नेतृत्व अशी ही थरारक लढाई रंगली होती. परंतु, कोल्हापूरच्या स्वाभिमानी मतदारांनी भंडारा आणि शपथांच्या राजकारणाला अजिबात भीक घातली नाही.

महायुतीच्या या दारुण पराभवाला त्यांचीच कुटील रणनीती कारणीभूत ठरली. उमेदवार निवडीसाठी अखेरच्या क्षणापर्यंत चाललेले शह-काटशहाचे राजकारण, अदृश्य शक्तींच्या साहाय्याने १४०० ठरावधारकांचा मताधिकार हिरावण्याचा कट, आणि प्रचारातील आतून पोखरलेले बेगडी ऐक्य यामुळे मतदार कमालीचे बिथरले होते. रिंगणात महायुतीने वंशवादाचे वारस उभे केले होते. विद्यमान अध्यक्ष हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ आणि २५ वर्षे गोकुळवर अधिराज्य गाजवणारे महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांना उतरवून घराणेशाहीचे घोंगडे पांघरले होते. नेत्यांच्या मुलाबाळांना आणि प्रस्थापितांना निवडून देण्यासाठी सर्वसामान्यांनी जीवाची बाजी का लावावी, या उद्विग्नतेतून मतदारांनी जाडजूड पाकीट स्वीकारताच एकाधिकारशाहीला सडेतोड धडा शिकवला.

सतेज पाटील यांनी गोकुळचा हा गोवर्धन एका बोटावर पेलत सूत्रबद्ध आणि संयमी प्रचाराच्या जोरावर विरोधकांचे गड-कोट पार उध्वस्त केले. या निकालाने विरोधकांना घरचा रस्ता दाखवला असून, याचे दूरगामी राजकीय पडसाद आगामी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रणधुमाळीवर उमटणार अशी चर्चा रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button