संभ्रम सोडा, आत्मविश्वासाने संकटावर व्हा स्वार!

कोकण-कोल्हापूर विभागीय मंडळाचा उपक्रम; पाच जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

रत्नागिरी :

दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेचा ताण, अभ्यासाचे नियोजन आणि निकालाची भीती यांवर मात करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाच्या वतीने ‘बोर्ड परीक्षेचा राजमार्ग : सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे’ हा उपक्रम राबविण्यात आला. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांनी या विशेष ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचा लाभ घेतला.

बोर्ड परीक्षेची भीती मनातून काढून टाकत योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोनातून यश मिळवता येते, असा संदेश कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना दिला. गुणवत्तेत सातत्य राखण्यासाठी अभ्यासासोबतच दैनंदिन जीवनात शिस्त, निरोगी शरीर आणि शांत मन आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी कोल्हापूर मंडळाचे सचिव गजानन उकिरडे, कोकण विभागीय मंडळाच्या सचिव पुनीता गुरव यांच्यासह अधिकारी व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

अनुभवी शिक्षक श्रीराम टेके यांनी अभ्यासाचे नियोजन, विषयांचे वर्गीकरण, महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोंदी आणि प्रश्नपत्रिकांचा सराव यांचे महत्त्व स्पष्ट केले. कठीण विषयांना अधिक वेळ देणे, नियमित उजळणी करणे आणि परीक्षेपूर्वी वेळेचे नियोजन करून जुन्या प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची इतरांशी तुलना न करता पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व मॅरेथॉन धावपटू डॉ. राहुल फासे यांनी सकस आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि डोळ्यांच्या काळजीचे महत्त्व पटवून दिले. अभ्यासाच्या काळात भ्रमणध्वनीचा वापर मर्यादित ठेवावा, संतुलित आहार घ्यावा आणि रात्री जागरण टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कपिल लळीत यांनी परीक्षा काळातील मानसिक ताण आणि त्यावरील उपाय स्पष्ट केले. अतिचिंता आणि अभ्यासातील चालढकल या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा ठरतात. त्यामुळे नियमित अभ्यास, सकारात्मक विचार, श्वसनाचे तंत्र आणि शिक्षकांची मदत यांचा आधार घ्यावा. घोकंपट्टी करण्याऐवजी वाचलेला भाग स्वतःच्या शब्दांत समजावून सांगणे ही प्रभावी उजळणीची पद्धत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे यांनी तज्ज्ञांचे आभार मानले. दोन तास चाललेल्या या मार्गदर्शन सत्रातून विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन, आरोग्याची काळजी आणि मानसिक ताणाचे व्यवस्थापन याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button