प्रशांत भूषण यांच्या सत्ता उलथवून लावण्याच्या विधानावर अभिजीत दिपकेंचे उत्तर; आंदोलनामागचा हेतू सांगताना म्हणाले.!

Abhijeet Dipke on Prashant Bhushan Regime Change Remark : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा आणि निवडणूक आयोगाने राबवलेली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी, डाव्या संघटना आणि विरोधकांचे आंदोलन सुरू आहे.

आंदोलन रोखण्यासाठी सरकारने दिल्लीत मोठा फौजफाटा तैनात केला आहे. यानिमित्ताने १५ ऑक्टोबर रोजी दिल्ली प्रेस क्लब येथे एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये अभिजीत दिपके, नेहा बोरा, अभिनेते प्रकाश राज यांच्यासह ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी आपापली भूमिका मांडली होती. ज्यात प्रशांत भूषण यांनी हे आंदोलन सत्ता उलथवून लावण्यासाठी असल्याचे म्हटले होते.

प्रशांत भूषण यांच्या विधानावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलन हा दिखावा असून हा सरकार उलथवून लावण्यासाठीचा प्रयत्न असल्याचा पलटवार भाजपा आणि मित्र पक्षांनी केला. यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.

अभिजीत दिपके यांनी प्रशांत भूषण यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. “आम्हाला सरकार बदलायचे आहे किंवा सरकारमध्ये काही बदल करायचे आहेत, असे आम्ही म्हणत नाहीत. आमचे एवढेच म्हणणे आहे की, ज्या मुख्य आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेशी छेडछाड केली, दोन आयुक्तांचे मत फेटाळून लावले आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांना केराची टोपली दाखवली, अशा आयुक्तांना पदावरून दूर करावे. तसेच नवीन मुख्य आयुक्त पारदर्शक पद्धतीने निवडावा”, असे विधान अभिजीत दिपके यांनी केले आहे.

प्रशांत भूषण यांनी पत्रकार परिषदेत ‘रिजीम चेंज’ असा शब्द वापरला होता. ज्यावरून भाजपाने जोरदार हल्लाबोल केल्यानंतर काही तासांतच अभिजीत दिपके यांनी हे स्पष्टीकरण दिले.

नेहा बोराच्या बांगलादेशबद्दलच्या विधानावरही भाष्य

एआयएसए या विद्यार्थी संघटनेच्या नेत्या नेहा बोरा यांच्या एका जुन्या विधानावरून भाजपाने टीका सुरू केली आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारविरोधात झालेल्या जेन-झी आंदोलनावेळी नेहा बोरा यांनी या आंदोलनापासून प्रेरणा घ्यायला हवी, असे विधान केले असल्याचा दावा भाजपाने केला होता. गुरूवारी भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले की, राहुल गांधी आणि त्यांच्याशी निगडित संपूर्ण इकोसिस्टिम बांगलादेशसारखी अराजकता निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहे.

यावर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी सीजेपीचा लढा हा केवळ निवडणूक आयोगापुरताच मर्यादीत असल्याचे म्हटले. “आम्ही काय मागत आहोत? तर निवडणूक आयोगात झालेल्या गैरकारभाराची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. लोकशाहीमध्ये अशी मागणी करणे हे पाप किंवा गुन्हा आहे का?”, अशी भूमिका दिपके यांनी मांडली.

धनखड जातात, मग ज्ञानेश कुमार का नाही? – दिपके

“केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना असे काय दिले आहे की, त्यासाठी त्यांना वाचवले जात आहे. त्यांच्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेत रुपांतरित करून दिल्ली ठप्प केली आहे. तत्कालीन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा देखील राजीनामा घेतला मग, ज्ञानेश कुमार यांना का संरक्षण दिले जात आहे,” अशी टीकाही अभिजीत दिपके यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button