नवयुग मित्र मंडळ आणि जागृती महिला मंडळ वाकी पूर्ववाडीचा जलसंधारणासाठी स्तुत्य उपक्रम

वार्षिक वर्गणीतून जेसीबीच्या साह्याने बांधले दोन मोठे बंधारे

गुहागर : यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन गुहागर तालुक्यातील नवयुग मित्र मंडळ वाकी आणि जागृती महिला मंडळ वाकी – पूर्ववाडी यांच्या वतीने वार्षिक जमा होणाऱ्या लोकवर्गणीतून वाकी नदीवर नुकतेच जेसीबीच्या साहाय्याने दोन मोठे बंधारे बांधण्यात आले. नदीपात्रातील व नदीकाठावरील अनावश्यक झाडी दूर करून उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांतून राबवलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद व इतरांसाठी प्रेरणादायी आहे, दरम्यान, बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी, विशेषतः लहान मुलांनी, तेथे पोहण्यासाठी जाऊ नये, असे आवाहन वाकी गावातर्फे करण्यात येत आहे.
पालपेणे गावातून वाहत येणारी नदी वाकी – पिंपळवट – आरे अशी गावागावातून वाहत जाऊन समुद्राला मिळते. १०-१५ वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी नदी म्हणून वाकी नदी गुहागर तालुक्यात प्रसिद्ध होती; परंतु पुराच्या पाण्यामुळे आणि मागील काही वर्षांपूर्वी पालपेणे गावातून गेलेल्या गॅस (गेल कंपनी) लाईनच्या (१-२ वर्ष) सततच्या कामामुळे जमिनीतून निघालेला चिखल याने नदीच्या तळाशी बसलेल्या गाळाने खडकासारखी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात येणारे पाणी लगेच निचरा होऊन नदीचा पाणीसाठा अगदी जानेवारी – फेब्रुवारी दरम्यान कमी होतो. पाणी साठा पूर्ववत करण्यासाठी आणि नदी पुन्हा वाहती करण्यासाठी पालपेणे ते पिंपळवटपर्यंत सर्व नदीचा गाळ उपसा करून पाटबंधाऱ्याचे व्यवस्थित नियोजन केले, तर भविष्यात पालपेणे, वाकी पिंपळवट व आरे या आसपासच्या गावांचा पाणी प्रश्न निकाली लागेल, असे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी नाम फाउंडेशनच्या वतीने नदीची पाहणी करून आराखडा तयार करण्यात आला होता; परंतु निधी संकलन न झाल्याने काम तसेच राहून गेले, असे येथील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. आगामी काळात शासनाने देखील गुहागर तालुक्यातील जेवढ्या नदी नाले असतील त्यांचा गाळ उपसा करून योग्य तेथे पाणीसाठा करण्यासाठी पाटबंधारे बांधून पाणी प्रश्नावर विशेष कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे पाणी वाचवण्यासाठी आणि जलसंधारणासाठी प्रत्येक गावातील सर्व वाड्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन नवयुग मित्र मंडळ आणि जागृती महिला मंडळ वाकी पूर्ववाडी येथील ग्रामस्थांकडून आणि महिला मंडळाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button