
जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणारे काळ्या यादीत- पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी, दि. १० ):- रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला,
शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल दाभोळकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
भविष्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात जलजीवन मिशनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, महावितरण व पाणी पुरवठा विभागाने समन्वय ठेवून ही कामे पूर्ण करण्यास प्रयत्न करावेत. तसेच जी कामे पूर्ण करण्यासाठी स्थानिक नागरिक अथवा अन्य कोणी अडथळा निर्माण करत असेल त्यांच्याबाबत पोलीस विभागाकडे तक्रार करावी, अशा सूचना डॉ. सामंत यांनी बैठकीत संबंधितांना दिल्या. बैठकीला मतदार संघातील ठेकेदार उपस्थित होते.
शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या घेतल्या जाणून
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समस्या पालकमंत्री डॉ. सामंत यांनी जाणून घेतल्या. यावेळी महाविद्यालयातील स्टाफची कमतरता, प्रशिक्षणाचा अभाव तसेच लॅबमध्ये पुरेसी उपकरणे उपलब्ध नसणे अशा समस्या विद्यार्थ्यांनी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. या समस्या सोडविण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. टेक्नीकल फेस्टिव्हल आणि ऑटो एक्सपो सारखी प्रदर्शन भरविण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य सुधीर अकोजवार, विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी, विद्यार्थी उपस्थित होते.
९ मे २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना कृषी क्षेत्राप्रमाणे पायाभूत सुविधा व सवलती देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यकास्तकारांना (प्रक्रिया उद्योग वगळता) कृषीदराने वीज पुरवठा देण्यात देण्याची तरतूद आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय विभागाकडून महावितरणकडे ५६ प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यापैकी २२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. या सर्वांना कृषी दराने वीज पुरवठा करण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बैठकीत दिल्या.
बैठकीला सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय जीवन सावंत, नगरसेवक बंड्या साळवी, माजी नगरसेवक सुदेश मयेकर, ॲङ समृध्दी मयेकर आदी उपस्थित होते.




