
कोकणनगरमध्ये ९८ टक्के रेशनधारकांना धान्य वाटप; नागरिकांमध्ये समाधान
रत्नागिरी : कोकणनगर येथील रेशनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुरवठा विभागाच्या अहवालानुसार, सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत नवीन रेशन दुकानामार्फत ७०० पैकी तब्बल ६९४ रेशनकार्डधारकांना धान्याचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ९८ टक्के रेशनधारकांपर्यंत धान्य पोहोचले असून, नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी रेशन दुकानातून धान्य घेताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच काही नागरिकांना नियमानुसार पूर्ण धान्य मिळत नसल्याच्या तक्रारीही होत्या. नागरिकांच्या या समस्या लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक केतन उमेश शेट्ये आणि नगरसेविका फौजिया तन्वीर मुजावर यांनी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून नागरिकांसाठी नवीन रेशन दुकानदाराची व्यवस्था करून देण्यासाठी पुढाकार घेतला.
नवीन रेशन दुकानदार सचिन सुर्वे यांच्या माध्यमातून धान्य वाटपाची प्रक्रिया अधिक सुरळीत झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरअखेर ९८ टक्के रेशनधारकांना धान्य मिळाल्याने कोकणनगरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नागरिकांच्या अडचणी सोडवून त्यांना नियमित व सुरळीतपणे धान्य मिळावे, यासाठी करण्यात आलेल्या या पाठपुराव्यामुळे रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.



