
‘बैल गेला आणि झोपा केला’; दुष्काळी दौऱ्यावर भास्कर जाधवांची टीका
राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या दौऱ्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी टीका केली आहे. ‘बैल गेला आणि झोपा केला,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या कारभारावर निशाणा साधला.
जवळपास दीड महिन्यांपासून पाऊस गायब असताना संपूर्ण महाराष्ट्रातून ओरड झाल्यानंतर सरकारला दुष्काळी परिस्थितीची जाणीव झाली, असा आरोप जाधव यांनी केला. विरोधकांनी आवाज उठवल्यानंतरच सरकार जागे झाले असून, सरकारी यंत्रणेला यापूर्वी परिस्थितीची कल्पना नव्हती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘देखल्या तेव्हा दंडवत’ अशा पद्धतीने सरकार काम करत असल्याची टीका करत जाधव म्हणाले की, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ देणे, शेतकऱ्यांवर संकट येऊ देणे आणि त्यानंतर दौरे करणे, अशी सरकारची भूमिका असल्याचे दिसते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे दौरे केवळ दिखाव्यासाठी असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘कोकणात किती उद्योग आणले?’
दापोलीतील भिवबंदर येथे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुद्द्यावरही जाधव यांनी सरकारला लक्ष्य केले. २०१४ पासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचा संदर्भ देत, या काळात कोकणात किती उद्योग आणले, असा सवाल त्यांनी केला. कोकणातील तरुणांना लाखो रोजगार देण्याच्या घोषणा झाल्या; मात्र प्रत्यक्षात एकही मोठा प्रकल्प आला नसल्याची टीका त्यांनी केली.
गुहागरमध्ये आपण आणलेली एमआयडीसी रद्द करण्याचे पाप सरकारने केले आणि त्याचेही श्रेय घेतले जात असल्याचा आरोप जाधव यांनी केला. भिवबंदर येथे अणुऊर्जा प्रकल्प आणताना मुख्यमंत्री स्थानिक नागरिक, स्थानिक आमदार तसेच उद्योगमंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचा दावा त्यांनी केला. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी घोषणा करण्याची सरकारला सवय लागल्याची टीकाही त्यांनी केली.
एन्रॉन प्रकल्पाच्या जमिनीचा मुद्दा उपस्थित
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील एन्रॉन प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचाही मुद्दा जाधव यांनी उपस्थित केला. प्रकल्पासाठी आवश्यक तेवढीच जमीन ठेवून उर्वरित जमीन शेतकऱ्यांना परत करण्याची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्पासाठी जमीन घेतल्यानंतर तो निर्धारित मुदतीत पूर्ण झाला नसेल, तर संबंधित जमीन शेतकऱ्यांना परत करण्याबाबत विचार व्हावा. शेतकऱ्यांनी पडीक जमीन परत मिळावी, अशी मागणी केली असल्यास सरकारने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणीही जाधव यांनी केली.




