
सेवा संकल्प अभियान’ ठरतंय दिलासादायक; जिल्हा परिषद आरोग्य सेवेचे लाभार्थ्यांकडून कौतुक
रत्नागिरी, दि. १७ ): सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा आणि आदरयुक्त वागणुकीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पुण्याहून रत्नागिरीत आलेल्या अॅडव्होकेट तहसीन इनामदार या गरोदर मातेने या अभियानादरम्यान मिळालेल्या अनुभवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तपासणीसाठी केंद्रावर आल्यानंतर येथील डॉक्टर, कर्मचारी आणि उपस्थितांकडून अत्यंत आदराची व आपुलकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, “मी सध्या सातव्या-आठव्या महिन्यात असून पुण्यावरून आल्यानंतरचा माझा हा पहिलाच अनुभव आहे. केंद्रावर प्रवेश केल्यापासून तपासणी पूर्ण होईपर्यंत सर्व डॉक्टर्स आणि सपोर्टिंग टीमने अतिशय सहकार्य केले. पुण्यातही मला सहसा न मिळालेला सन्मान आणि काळजी येथे पाहायला मिळाली. पुढील काही महिन्यांसाठी आवश्यक असणारी सर्व आरोग्य सेवा व सहकार्य येथून उत्तम प्रकारे मिळेल, असा मला पूर्ण विश्वास वाटतो.”
१७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ‘सेवा संकल्प अभियाना’तून आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व मोफत आरोग्य सुविधा पुरवल्या जात असून, प्रशासनाच्या या उपक्रमामुळे दुर्गम व शहरी भागातील नागरिकांना मोठा आधार मिळत आहे.




