
मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेच्या पुलाच्या सक्षमतेबाबत महामार्ग प्राधिकरणच साशंक? मुंबई गोवा महामार्गावरील पुलाच्या भिंतीना काचेच्या चिकटपट्ट्यांचा टेकू!
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे येथील पुलाची सक्षमतेबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच साशंक आहे की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्राधिकरणाकडून पुलाच्या सक्षमतेच्या तपासणीसाठी भिंतीवर काचेच्या पट्ट्यांच्या चिकटपट्ट्या बसविण्यात आल्या आहेत. तर पुलाच्या पृष्ठभागावर लोखंडी सळयांचे जोड दिले जात आहेत. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या कामांच्या दर्जावरून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली होती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात हलक्या वाहनांसाठी नागोठणे पूल तात्पुरता सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. गणेशोत्सवानंतर पुलाचा धोकादायक भाग हटवून नव्याने बांधकाम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने हालचाली सुरू केल्या आहेत. पण त्याआधी पुलाच्या सक्षमतेची चाचपणी आणि मजबुतीकरण महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अवघ्या आठवडाभरात पृष्ठभागाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. बाजूच्या भिंतींना फुगवटा निर्माण झाल्याचे आढळले. त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह आयआयटीच्या तज्ज्ञांनीही पुलाची पाहणी केली होती.
गणेशोत्सवात कोकणवारीसाठी ५,७४१ एसटी बस आरक्षित
तेव्हापासूनच पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले होते. आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा नादुरुस्त झालेला नवा कोरा पूल प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुन्हा सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. मात्र हे करतांना लोकांचे जीव धोक्यात येणार नाहीना याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
महामार्ग प्राधिकरणाने पुलाच्या भिंतीना एमसीलच्या साह्याने काचेच्या चिकटपट्या लावल्याचे मंगळवारी दिसून आले. याची चित्रफीत मंगळवारी प्रसारीत झाली. त्यामुळे उलट सुलट चर्चांना ऊत आला. अशा पध्दतीने काचेच्या चिकटपट्ट्यां लावून पुल सक्षमता वाढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर भिंतीच्या पॅनेल्सवर हालचाल अथवा विस्थापन यांचे सातत्याने परीक्षण व नोंद करण्यासाठी मॉनिटरिंग उपकरणे बसविण्यात येत आहेत. संरचनेची स्थिरता आणि तिचे वर्तन तपासण्यासाठी तसेच भविष्यात आणखी काही दुरुस्तीची आवश्यकता आहे का, हे निश्चित करण्यासाठी ही वैज्ञानिक निरीक्षणाची उपाययोजना असल्याचा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. सक्षमता चाचणी आणि तांत्रिक मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचेही महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
नागोठणे पुलाची सक्षमता तपासण्यासाठी तांत्रिक चाचणी सुरू आहे. त्यासाठी पुलाच्या प्रभावित भिंतीवर उपकरणे बसविण्यात आली आहेत. पुलाच्या प्रभावित भागात दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे करण्यात येत असून, निरीक्षण उपकरणांच्या माध्यमातून संरचनेतील हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. तांत्रिक तपासणीत पूल सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच छोट्या वाहनांना वाहतुकीस परवानगी देण्यात येईल.- रविंद्र इंगोले, प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण




