
ठाण्यात दहीहंडीचा थरार; १० गोविंदा जखमी, शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी दाखल!
ठाणे तसेच घोडबंदर भागात लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले असून याठिकाणी गोविंदा पथके उपस्थिती लावून उंच-उंच मानवी थर लावताना दिसून येत आहेत. असेच थर रचताना खाली कोसळून झालेल्या अपघातात एकूण १० गोविंदा जखमी झाले आहेच. त्यांना ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरात लाखो रुपये बक्षिसांच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. यात राजकीय पक्ष आणि त्यांच्याशी संबंधित मंडळांचा समावेश असतो. या बक्षिसांची रक्कम जिंकण्यासाठी मुंबई आणि आसपासच्या शहरातील पथके ठाण्यात येतात. यंदाही हे चित्र कायम आहे. शनिवारी शहरात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी गोविंदा पथके उंच थर लावताना दिसून आले. ठाण्याचा राजा आणि रामनगरचा राजा या दोन ठाण्यातील गोविंदा पथकांनी नऊ थर लावले. तर, मुंबईतील पथकांकडूनही असेच नऊ थर लावण्यात आले. एकूणच उंच थर लावण्याची स्पर्धा पथकांमध्ये दिसून आली.
उंच थर रचताना खाली कोसळून झालेल्या अपघातात एकूण १० गोविंदा जखमी झाले आहेच. त्यापैकी ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चार गोविंदांवर उपचार सुरू आहेत. जतिन पाटील (३०) यांच्या कमरेला आणि मानेला दुखापत झाली आहे. जतिन केशरी (३१) यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. नंदकिशोर शेलार (६५) यांच्या डोक्याला दुखापत झाली, तर निखिल यादव (३५) यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात सहा गोविंदा उपचारासाठी दाखल झाले. हर्ष शर्मा (२१), गिरीश चिपकर (२३), आयुष गुप्ता (१९) आणि अमेय नाईक (२३) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अमन यादव (२१) यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. ओमकार शिंदे (२५) यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. दहीहंडी उत्सवात उंचच उंच मानवी थर रचताना सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. उत्साह आणि थरार कायम ठेवतानाच गोविंदा पथकांनी सुरक्षेची काळजी घेण्याची गरज या घटनांमधून अधोरेखित झाली आहे.




