अतिक्रमण हटाव मोहीम कायमस्वरूपी राबवा; रमेशनगरवासीयांची ठाम मागणी


मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरही तातडीने उपाययोजना करण्याची नगर परिषदेकडे विनंती


रत्नागिरी शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचे रमेशनगर परिसरातील नागरिकांनी स्वागत करत ही कारवाई केवळ तात्पुरती न ठेवता कायमस्वरूपी आणि सातत्याने राबवावी, अशी ठाम मागणी केली आहे. त्याचबरोबर शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवरही प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी रत्नागिरी नगर परिषदेकडे केली आहे.

वार्ड क्रमांक ५ मधील रमेशनगर येथील रहिवाशांनी नगराध्यक्ष श्रीमती शिल्पाताई सुर्वे, बांधकाम सभापती श्री. नागवेकर, नगरसेवक श्री. बंटी कीर, वार्ड क्रमांक ५ च्या नगरसेविका श्रीमती पुजाताई पवार तसेच श्री. सौरभ मलुष्टे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले.

रत्नागिरी नगर परिषदेने शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी घेतलेल्या ठाम भूमिकेबद्दल नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले. शहर अधिक सुटसुटीत, सुरक्षित आणि नागरिकांसाठी सुलभ व्हावे, यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, शहरातील मोकाट गुरे आणि भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून अपघाताची शक्यता वाढत आहे. तसेच भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोन्ही समस्यांवर तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी रमेशनगरवासीयांनी केली.

निवेदन देताना वार्ड क्रमांक ५ मधील श्री. राजन सावंत (खोत), श्री. समीर इंदुलकर, श्री. मोहन मालुसरे, श्री. मोहन देसाई, ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री. दीपक देसाई, श्री. प्रमोद गानू आणि श्री. नंदू सावंत (खोत) उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button