राममंदिर ट्रस्टचे पहिले CEO म्हणून AI तंत्रज्ञानाच्या मदतीनं माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड; तीन नवे विश्वस्तही निश्चित!

अयोध्या येथील ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’च्या प्रशासनात अत्यंत महत्त्वपूर्ण फेरबदल करण्यात आले आहेत. मंदिराच्या संपूर्ण व्यवस्थापनाची धुरा सांभाळण्यासाठी भारतीय हवाई दलाचे माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची ट्रस्टचे पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच तीन नव्या विश्वस्तांनाही ट्रस्टच्या संचालक मंडळात स्थान देण्यात आले आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

गेल्या काही दिवसांत राममंदिरातील देणगी चोरीच्या आरोपांनंतर सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेल्या राजीनाम्यांमुळे ही पदे रिक्त झाली होती. तसेच अयोध्येच्या माजी राजघराण्याचे वंशज विमलेन्द्र प्रताप मिश्रा यांच्या निधनामुळे तिसरी जागा रिकामी होती. या पार्श्वभूमीवर पारदर्शक कारभारासाठी आणि मंदिर व्यवस्थापनाला कॉर्पोरेट आणि तांत्रिक शिस्त आणण्यासाठी ही मोठी पावले उचलण्यात आली आहेत.

तीन नव्या विश्वस्तांची नावे निश्चित

बुधवारी अयोध्यात आयोजित उच्चस्तरीय बैठकीत ट्रस्टच्या रिकाम्या तीन जागांवर नव्या चेहऱ्यांची निवड करण्यात आली. विश्वसनीय सूत्रांनुसार खालील तीन नावांना मंजुरी मिळाली आहे:

  • महेश भागचंदका: ‘M2K फाऊंडेशन’चे अध्यक्ष आणि अशोक सिंघल फाऊंडेशनचे विश्वस्त. त्यांनी दिवंगत संघनेते अशोक सिंघल यांच्यावर पुस्तक लिहिले असून, दरवर्षी कारसेवक पुरममध्ये अपंगांना सायकली वाटप करणे आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो.
  • मदन मोहन पांडे : स्थानिक न्यायालयात राम जन्मभूमी खटल्याच्या सुनावणीदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावणारे वकील आणि विश्व हिंदू परिषेशी निगडीत कार्यकर्ते.
  • निर्मल यादव: ओबीसी (OBC) समाजातील प्रतिनिधी म्हणून त्यांना ट्रस्टमधील विश्वस्तपदी संधी देण्यात आली आहे.

या तीन नव्या निवडींमध्ये सामाजिक आणि जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला असून, राममंदिर आंदोलनात योगदान देणाऱ्या ब्राह्मणासह इतर मागासवर्गीय (OBC) समाजाला यात प्रतिनिधित्व मिळाले आहे.

AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे झाली CEO ची निवड

ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची निवड अत्यंत पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने पार पडली. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर दिलेल्या माहितीनुसार:

‘CEO पदासाठी तब्बल ५,५८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांपैकी प्राथमिक टप्प्यात १६ उमेदवारांची मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत अत्यंत तज्ज्ञ अशा तीन अधिकाऱ्यांची नावे ट्रस्टकडे सोपवण्यात आली होती, ज्यातून माजी एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची निवड झाली.’

शोध समितीचे सचिव समीर पांडा यांनी स्पष्ट केले की, दिल्ली-NCR, पुणे आणि संबलपूर येथील तांत्रिक पथकांनी AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि मॅन्युअल स्क्रिनिंगच्या मदतीने उमेदवारांची अचूक छाननी केली. ३ ते ६ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन संवाद आणि ११-१२ ऑगस्ट रोजी अयोध्येत प्रत्यक्ष मुलाखती पार पडल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मंदिराचे व्यवस्थापन सांभाळू शकतील अशा उच्च दर्जाच्या नेतृत्वाची या पदासाठी निवड करण्यात आली आहे.

‘रामधनाची चोरी होणार नाही अशी आशा’: अखिलेश यादव यांचा टोला

दुसरीकडे, राममंदिर ट्रस्टच्या या महत्त्वाच्या बैठकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पत्रकारांशी बोलताना भाजप सरकार आणि मंदिर प्रशासनावर जोरदार निशाणा साधला.

‘अयोध्यात नव्या घडामोडी घडत असल्या तरी आपण जुन्या घटना विसरू शकतो का? आम्हाला कुणाबद्दल वैयक्तिक तक्रार नाही, पण ज्या प्रकारे देणगीची चोरी झाली ती गंभीर बाब आहे. या प्रकरणात सामान्य कर्मचाऱ्यांना तुरुंगात धाडण्यात आले, पण बड्या नावांना सोडून देण्यात आले. आता तरी ‘रामधनाची’ (देणगीची) चोरी होणार नाही, अशी आम्ही आशा करतो,’ असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला.

तसेच अयोध्येचा जागतिक स्तरावर विकास होण्याऐवजी भाजप नेत्यांच्या हावेपोटी तिथल्या स्थानिक गरिबांच्या जमिनी बळकावण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button