महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका

हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचा समावेश

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी नाट्य संस्थांकडून २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. हौशी मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत नाट्य स्पर्धांसह बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांचाही यात समावेश असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या राज्य नाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

२३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी डिसेंबर २०२६ पासून राज्यातील विविध १० केंद्रांवर होणार आहे. तसेच ६५ व्या हौशी हिंदी, संगीत आणि संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रत्येकी एका केंद्रावर डिसेंबर २०२६ पासून आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थांना विहित नमुन्यातील प्रवेशिका आणि स्पर्धेचे नियम संचालनालयाच्या https://mahanatyaspardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

विहित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नसल्यास अथवा संपूर्ण तपशील भरलेला नसल्यास ऑनलाईन प्रवेशिका सादर करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेला संबंधित संस्थेने नाट्यप्रयोग सादर न केल्यास प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी संस्थांना शासनाचे सर्व नियम बंधनकारक राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांना अपात्र ठरविण्यात येईल.

राज्यातील जास्तीत जास्त नाट्य संस्थांनी महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button