
खेड एसटी आगाराच्या अनागोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका
खेड एसटी आगाराच्या अनागोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. उशिराने सुटणार्या बसफर्यांमुळे विद्यार्थी, महिला व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला असल्याचा आरोप रिपाइंचे कोकण प्रदेश युवक अध्यक्ष सुशांत सकपाळ यांनी केला आहे. एसटी प्रशासनाने कारभारात तातडीने सुधारणा न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एसटी बस जीवनवाहिनीच आहे. येथील आगारातून अनेक मार्गावरील बसफेर्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने मार्गस्थ होत असल्याने वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले आहे. शाळा व महाविद्यालये सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना बसेसची प्रतीक्षाच करावी लागत असून पर्यायाने रात्री उशिरा घर गाठावे लागत आहे.




