गणेशोत्सवापूर्वी राजापूर शहरात ‘वन साइड पार्किंग’ व्यवस्था करण्याची मागणी

मुख्य रस्त्यावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीचा खोळंबा; सूचना फलक लावण्याचीही मागणी



राजापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुख्य रस्त्यावर गणेशोत्सव संपेपर्यंत एका बाजूला ‘वन साइड पार्किंग’ व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी जनसेवक विवेक गुरव यांनी राजापूर नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर सध्या दोन्ही बाजूंना बेशिस्तपणे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. यामुळे रुग्णवाहिका, शाळांच्या बसेस तसेच नागरिकांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून, ये-जा करताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गणेशोत्सव जवळ आल्याने राजापूरच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.
त्यामुळे गणेशोत्सव संपेपर्यंत मुख्य रस्त्यावर एका बाजूला पार्किंगची व्यवस्था करावी, ‘एका बाजूला पार्किंग’ तसेच ‘नो पार्किंग’चे सूचना फलक लावावेत आणि वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पार्किंगच्या नियमांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची तातडीने दखल घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा विवेक गुरव यांनी व्यक्त केली आहे.
निवेदनाची प्रत राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच राजापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button