नाणार बॉक्साईट उत्खननाची जनसुनावणी ७ सप्टेंबरला प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; पर्यावरण, जलस्रोत, शेती व आंबा बागायतीवर परिणामाची भीती


राजापूर : जनतेच्या तीव्र विरोधामुळे यापूर्वी रद्द करण्यात आलेल्या राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाच्या पर्यावरणीय विषयावरील जनसुनावणीची तारीख अखेर निश्चित झाली आहे. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता सागवे (घोडपोई) येथील श्री कात्रादेवी मंगल कार्यालयात ही जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे बॉक्साईट उत्खननाच्या मुद्द्यावरून नाणार परिसरातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाणार परिसरातील सुमारे १४४.९५ हेक्टर क्षेत्रावर बॉक्साईट उत्खननाचा प्रस्ताव असून, या प्रकल्पाची प्रस्तावित उत्पादन क्षमता ०.९ दशलक्ष टन प्रतिवर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होण्याबरोबरच नैसर्गिक जलस्रोत, शेती आणि विशेषतः कोकणातील आंबा बागायतीवर विपरीत परिणाम होण्याची भीती स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
यापूर्वीही बॉक्साईट प्रकल्पाच्या जनसुनावणीच्या मुद्द्यावरून राजापूर तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. राजापूर पंचायत समितीच्या सभेतही प्रस्तावित बॉक्साईट उत्खननाला विरोध दर्शविण्यात आला होता. पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांऐवजी पर्यावरणपूरक विकास प्रकल्पांना प्राधान्य देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली होती.
दरम्यान, नाणार परिसराने यापूर्वी रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोठा संघर्ष अनुभवला आहे. आता बॉक्साईट उत्खननाचा विषय पुन्हा ऐरणीवर आल्याने स्थानिक पातळीवर अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. जनसुनावणीची घोषणा झाल्यानंतर नाणार, सागवे परिसरातील ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, बॉक्साईट उत्खननाला संघटितपणे विरोध करण्याची भूमिका स्थानिकांकडून घेतली जात आहे.
सुनावणीकडे तालुक्याचे लक्ष
नाणार बॉक्साईट उत्खननाचा प्रश्न केवळ एका गावापुरता मर्यादित नसून प्रस्तावित उत्खननाचा परिणाम लगतच्या गावांतील शेती, बागायती, जलस्रोत आणि पर्यावरणावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दि. ७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जनसुनावणीत ग्रामस्थ, पर्यावरणप्रेमी आणि संबंधित घटकांकडून कोणते आक्षेप व सूचना मांडल्या जातात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जनसुनावणीदरम्यान स्थानिकांकडून मांडण्यात येणारे आक्षेप, प्रकल्पाच्या बाजूने व विरोधात व्यक्त होणाऱ्या भूमिका आणि ग्रामस्थांच्या हरकतींची प्रशासनाकडून घेतली जाणारी दखल याला विशेष महत्त्व राहणार आहे. त्यामुळे ७ सप्टेंबरची जनसुनावणी नाणार परिसरातील प्रस्तावित बॉक्साईट प्रकल्पाच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button