
३ मोफत LPG सिलिंडर, महिलांना मोफत बस प्रवास; तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारचा मास्टरस्ट्रोक; विधानसभेत मोठ्या घोषणा!
TN CM Vijay Assembly Announcements : तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सोमवारी राज्य विधानसभेत अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा केली. यामध्ये पात्र लाभार्थ्यांसाठी वर्षाला तीन मोफत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा आणि महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास योजनेच्या विस्ताराचा समावेश आहे. स्वयंपाकाच्या गॅस योजनेअंतर्गत, तीन सिलिंडरची रक्कम पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी सोमवारी विधानसभेत अनेक मोफत योजनांची घोषणा केली. यामध्ये अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबाला वर्षाला तीन मोफत एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली.’अन्नपूर्णी सुपर सिक्स’ नावाची ही योजना पोंगल २०२७ पासून लागू केली जाईल आणि याचा फायदा सुमारे १.३० कोटी कुटुंबांना होण्याची अपेक्षा आहे.
या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या तीन एलपीजी सिलेंडरची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. या योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी सुमारे ४ हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडण्याचा अंदाज आहे. या योजनेची घोषणा करताना विजय म्हणाले की, आखाती प्रदेशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आणि सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक बोजा पडला आहे. “हे लक्षात घेऊन, आर्थिक अडचणीची परिस्थिती असतानाही, जनतेचा आर्थिक भार हलका करण्यासाठी, त्यांचं कल्याण साधण्यासाठी आणि जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी खर्च झालेली रक्कम त्यांना परत देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं त्यांनी विधानसभेत सांगितलें..
महिला आणि तृतियपंथियांसाठी मोफत प्रवास
मुख्यमंत्र्यांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी मोफत बस प्रवासाची घोषणा केली, तसंच महिलांसाठीच्या ‘वेत्री पयण थिट्टम’ या योजनेची व्याप्ती वाढवली. या विस्तारित योजनेअंतर्गत महिलांना केवळ सामान्य बसेसमधूनच नव्हे, तर एक्सप्रेस, एलएसएस (LSS) आणि डिलक्स बसेसमधूनही मोफत प्रवास करता येणार आहे. हा लाभ आंतर-जिल्हा बस सेवांसाठीही लागू असेल. ही विस्तारित योजना २ ऑक्टोबर रोजी सुरू केली जाईल. “महिलांचं प्रवासाचं स्वातंत्र्य हे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रगतीचा पाया आहे”, असं विजय म्हणाले.
त्यांनी नमूद केलं की, सध्याच्या मोफत प्रवास योजनेअंतर्गत महिलांना महानगर आणि शहरी भागातील सामान्य व डोंगरी मार्गावरील बसेसमध्ये केवळ ४० किमीपर्यंत प्रवास करण्याची परवानगी होती, तर एक्सप्रेस, एलएसएस, डिलक्स आणि उपनगरीय सेवांमध्ये मोफत प्रवास उपलब्ध नव्हता. “तमिळनाडूच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या महिलेला वाहतूक खर्चामुळे तिची संधी गमवावी लागू नये, हे सामाजिक न्यायाचे तत्त्व या सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे”, असं ते म्हणाले. हे लक्षात घेऊन सरकारने महिलांच्या मोफत प्रवास योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २ ऑक्टोबरपासून ‘वेत्री पयणम’ (यशस्वी प्रवास) या नावाने ही योजना लागू केली जाईल.




