
मिरज-पंढरपूर मार्गावर दीड कोटींचा ३०० किलो गांजा जप्त; कंटेनरसह एकास अटक!
सांगली : मिरज-पंढरपूर महामार्गावर तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करून तब्बल ३०० किलो तयार गांजा जप्त केला. या कारवाईत गांजाची वाहतूक करणाऱ्या मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली. गांजा, कंटेनर आणि मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व पथकाने ही कारवाई केली.
दि. २० ऑगस्ट रोजी पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंगेश मोरे हा अशोक लेलँड कंटेनर (क्र. एन एल ०१ एडी ९३६६) मधून मिरज-पंढरपूर मार्गे तयार गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तानंग फाट्याजवळ सापळा रचून कंटेनर अडवला.
कंटेनरची झडती घेतली असता चालकाच्या केबिनमधील कप्प्यात खाकी रंगाच्या चिकटपट्टीने घट्ट गुंडाळलेली १५० पाकिटे आढळली. प्रत्येक पाकिटाचे वजन अंदाजे दोन किलो असून, पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट-काळपट रंगाचा फुलबोंडे असलेला तयार गांजा आढळून आला. त्याचे एकूण वजन सुमारे ३०० किलो भरले.
पोलिसांच्या चौकशीत मोरे याने हा गांजा ओडिशा राज्यातील बालेगोडा ते तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे आणि तो पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्री करणार होता, याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहेत.
या कारवाईत १ कोटी ५० लाख रुपये किमतीचा गांजा, २५ लाख रुपये किमतीचा अशोक लेलँड कंटेनर आणि १० हजार रुपयांचा रेडमी मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व सायबर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला.



