वडिलोपार्जित जमिनीचा विश्वासघाताने अपहार केल्याची तक्रार; कारवलीच्या सरपंचांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी


राजापूर : तालुक्यातील मौजे कारवली येथील वडिलोपार्जित शेतीजमिनीचा विश्वासघाताने अपहार केल्याचा आरोप करत बदनापूर (पश्चिम), ठाणे येथे वास्तव्यास असलेले मूळ कारवली येथील रहिवासी अतुल तुळशीदास दसवंत यांनी राजापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात कारवलीचे सरपंच प्रकाश गंगाराम दसवंत, पोलीस पाटील सिद्धी सिद्धार्थ कांबळे तसेच ग्रामस्थ दिनेश धोंडू वाजे आणि जयवंत राघो गुरव यांनी संगनमताने कट रचून जमिनीचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, मौजे कारवली येथील सर्वे क्रमांक ४५/१३ तसेच अन्य मिळून एकूण २७ शेतीजमिनी, सुमारे २० एकर ३२ गुंठे क्षेत्रफळाची वडिलोपार्जित, अविभाजित कुटुंबाच्या मालकीची असून त्याबाबतचे ७/१२ उतारे व ८-अ उताऱ्यांच्या प्रती तक्रारीसोबत सादर करण्यात आल्या आहेत.
अतुल दसवंत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ते नोकरीनिमित्त कुटुंबासह ठाणे जिल्ह्यात वास्तव्यास असून सणासुदीला गावी येत असतात. त्यांच्या अनुपस्थितीचा फायदा घेत संबंधितांनी खोटी माहिती, अधिकारांचा गैरवापर आणि संगनमताच्या माध्यमातून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा विश्वासघाताने अपहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत कलम ३१८(४), २३६, २३७, २२७ तसेच कलम ६१ अन्वये संबंधितांविरुद्ध दखलपात्र गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राजापूर पोलीस ठाण्याकडे केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button