
एअर इंडियाचं विमान अचानक ३०० फूट खाली आलं; १२ जखमी, ‘आम्ही गाढ झोपेतच अन्.’ प्रवाशांनी सांगितला थरारक अनुभव!
Air India Phuket Delhi Flight Turbulence Video : थायलंडमधील फुकेत येथून राजधानी दिल्लीच्या दिशेने येणाऱ्या ‘एअर इंडिया’च्या विमानात प्रवासादरम्यान एक थरारक आणि धडकी भरवणारी घटना घडली आहे. अचानक हवेचा वेग, दाब किंवा दिशा बदलल्यामुळे (Turbulence) हे विमान हवेतच तब्बल ३०० फूट खाली आले. या भयानक घटनेमुळे विमानात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली असून, ०८ प्रवासी आणि ४ केबिन क्रू मेंबर्स असे एकूण १४ जण जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाच्या AI2379 (विमान नोंदणी क्रमांक VT-EXO) या विमानाने थायलंडच्या फुकेत शहरातून सकाळी ८:२५ वाजता दिल्लीसाठी उड्डाण केले होते. या विमानात एकूण १३४ प्रवासी प्रवास करत होते.
प्रवास सुरळीत सुरू असताना अचानक हवेच्या प्रवाहातील तीव्र बदलांमुळे विमानाला जोरदार धक्का बसला आणि अवघ्या काही सेकंदांत विमानाची उंची सुमारे ३०० फुटांनी खाली आली. या अचानक झालेल्या हादऱ्यामुळे विमानात बसलेले प्रवासी आणि कार्यरत असलेले क्रू मेंबर्स स्वतःचा समतोल राखू शकले नाहीत व जागेवरून फेकला गेल्याने काहींना दुखापत झाली.
दिल्लीत सुरक्षित लँडिंग; तातडीने वैद्यकीय मदत
या भीषण अनुभवानंतर पायलटने अत्यंत कौशल्याने विमान सांभाळले. सकाळी ११:५० वाजता हे विमान दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले.
“विमानात हवेच्या प्रवाहामुळे अचानक अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सर्व प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना विमानातून सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले आहे. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.” – प्रवक्ते, एअर इंडिया
विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच एअर इंडियाच्या वैद्यकीय पथकाने किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ प्रथमोपचार केले. खबरदारीचा उपाय म्हणून काहींना विमानतळावरील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेण्यात आले.
तपासाचे आदेश
एअर इंडियाने या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिला असून प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) या संपूर्ण घटनेचा सखोल आढावा घेत असून, घटनेची चौकशी करण्यासाठी संबंधित प्राधिकरणांना पूर्ण सहकार्य केले जात आहे.
‘टर्ब्युलन्स’ म्हणजे काय?
विमान प्रवासादरम्यान अचानक हवेचा वेग, दाब किंवा दिशा बदलल्यास विमानाला मोठे झटके बसतात. यालाच तांत्रिक भाषेत ‘टर्ब्युलन्स’ (Turbulence) किंवा ‘अपड्राफ्ट/डाऊनड्राफ्ट’ (Updraft/Downdraft) म्हटले जाते. अशा वेळी विमान अचानक काही फूट खाली येणे किंवा हलणे स्वाभाविक असते.
अनेक प्रवासी जखमी; प्रवाशांनी सांगितली आपबीती
‘विमानात नक्की काय घडलं?’ प्रवाशानं सांगितला अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव:
विमानातील एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने या घटनेची आपबीती सांगताना म्हटले, “उड्डाण करून साधारण तास-दीड तासाचा वेळ झाला होता. वेळ पहाटेची असल्याने विमानातील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत होते. तेवढ्यात अचानक चालू विमानात मोठा धक्का बसला. विमान एकाएकी थांबल्यासारखे वाटले आणि हवेतच वेडेवाकडे फिरू लागले. साधारण २ ते ३ मिनिटे हा थरार सुरू होता. यात १५ ते २० प्रवासी जखमी झाले असून विमानातील अनेक जण भीतीने हादरले आहेत. आम्ही एअर इंडियाविरोधात नक्कीच कायदेशीर कारवाई करणार आहोत.”
अचानक उंची घसरल्याने उडाली धांदल
विमान उंचावर असताना (क्रूझ फेज) अचानक हवामानातील बदलांमुळे जोरदार टर्ब्युलन्स निर्माण झाला आणि विमानाची उंची काही क्षणांसाठी झपाट्याने खाली आली. या अचानक बसलेल्या धक्क्यांमुळे सीटबेल्ट न बांधलेले अनेक प्रवासी आसनांवरून उडून आदळले आणि जखमी झाले. घटनेनंतर विमानाने दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. विमान उतरताच वैद्यकीय पथकाने तातडीने जखमी झालेल्या प्रवाशांवर प्राथमिक उपचार केले.
एअर इंडियाचे स्पष्टीकरण…
या घटनेबाबत एअर इंडियाच्या प्रवक्त्याने अधिकृत माहिती देताना सांगितले की, फुकेत-दिल्ली विमानाला प्रवासादरम्यान अचानक टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला.
विमानाचे लँडिंग सुरक्षित झाले असून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. जखमी प्रवाशांची विमानतळावरच तत्काळ तपासणी करण्यात आली असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.



