
देवस्थान इनाम जमिनीवरील शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ द्या; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोहन घुमे यांचे निवेदन
‘फार्मर आयडी’अभावी पीक विमा, पीएम-किसान, नमो शेतकरी योजनेसह विविध लाभांपासून शेतकरी वंचित
राजापूर : धोपेश्वर, बारसू, पन्हळे तर्फे राजापूर पंचक्रोशीतील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ मिळत नसल्याने ते पीक विमा, पीएम-किसान, नमो शेतकरी, कृषी कर्ज तसेच विविध शासकीय योजनांपासून वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित करत राजापूर (पश्चिम) तालुकाध्यक्ष मोहन अशोक घुमे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने शेतकऱ्यांसाठी ‘फार्मर आयडी’ अनिवार्य केली आहे. मात्र धोपेश्वर, बारसू, पन्हळे तर्फे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर ‘देवस्थान इनाम’ अशी नोंद असल्यामुळे कृषी विभाग आणि तलाठी कार्यालयाकडून त्यांच्या ‘फार्मर आयडी’ची नोंदणी केली जात नाही.
यामुळे संबंधित शेतकरी पीक विमा, पीएम-किसान, नमो शेतकरी योजना, कृषी कर्ज, अनुदान तसेच इतर विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ‘फार्मर आयडी’ देण्यासाठी विशेष आदेश जारी करून त्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मोहन घुमे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी या प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. वर्षानुवर्षे जमीन कसूनही केवळ महसुली नोंदीतील तांत्रिक अडचणीमुळे योजनांपासून वंचित राहावे लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन देवस्थान इनाम जमिनीवरील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.




