आंबोलीत पर्यटकांचा विक्रमी ओघ; १२ किमी वाहतूक कोंडीमुळे प्रवासी हैराण


वर्षा पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत रविवारी पर्यटकांची विक्रमी गर्दी पाहायला मिळाली. मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाल्याने आंबोली घाटमार्गापासून मुळवंदवाडीपर्यंत सुमारे १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी, केवळ १२ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल चार ते पाच तासांचा वेळ लागला.

मुख्य मार्गासह आंबोलीतील विविध पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवरही वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. या कोंडीचा फटका पर्यटकांसोबतच स्थानिक नागरिक, व्यापारी आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनाही बसला.

पर्यटन व्यावसायिकांच्या अंदाजानुसार, रविवारी दिवसभरात सुमारे दीड लाख पर्यटकांनी आंबोलीला भेट दिली. सलग सुट्ट्या आणि चौथ्या शनिवार-रविवारचा वीकेंड असल्याने शनिवारपासूनच पर्यटकांनी आंबोलीकडे मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरातील बहुतांश हॉटेल्स आणि निवास व्यवस्था पूर्णपणे भरल्या होत्या.

पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता भविष्यात वाहतूक नियोजन आणि मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button