
अभियांत्रिकी प्रवेशाच्या जागा स्वीकृती शुल्कात सीईटी कक्षाकडून वाढ, प्रत्येक बेटरमेंटसाठी भरावे लागणार शुल्क!
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) राबविण्यात येत असलेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आता प्रत्येक फेरीमध्ये जागा स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना शुल्क मोजावे लागणार आहे.
सीईटी कक्षाने केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत जागा स्वीकृती शुल्काच्या रचनेत यंदापासून बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलानुसार अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये पहिल्या फेरीनंतर ‘बेटरमेंट’द्वारे नवीन जागा स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी वाढीव शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे अंतिम प्रवेशासाठी चांगल्या महाविद्यालयाची किंवा शाखेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे.
सीईटी कक्षाने जारी केलेल्या सुधारित शुल्क रचनेनुसार, विद्यार्थ्याला केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान कितव्यांदा जागा वाटप होते, त्यानुसार जागा स्वीकृती शुल्क आकारण्यात येणार आहे. विद्यार्थ्याला पहिल्या फेरीमध्ये जागा मिळाल्यास ती स्वीकारण्यासाठी आतापर्यंत एक हजार रुपये शुल्क भरावे लागत हाेते. मात्र त्यानंतर कोणत्याही फेरीमध्ये जागा स्वीकृतीसाठी शुल्क भरावे लागत नव्हते. मात्र नव्या नियमानुसार पहिल्या फेरीमध्ये जागा स्वीकारण्यासासाठी एक हजार रुपये शुल्क भरल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये बेटरमेंटद्वारे त्याला अधिक चांगली जागा मिळाल्यास त्या जागेसाठी पुन्हा दोन हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आणखी एकदा बेटरमेंटद्वारे नवीन जागा मिळाल्यास तीन हजार रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील. हे शुल्क विद्यार्थ्यांना परत मिळणार नाही. शुल्क हे कोणत्या फेरीत जागा मिळाली यावर नव्हे, तर विद्यार्थ्याला कितव्यांदा जागा वाटप झाले यावर अवलंबून असणार आहे. सुधारित शुल्क रचना लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व शाखा पसंतीचा अर्ज काळजीपूर्वक भरण्याचे आवाहनही सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सीईटी कक्षाच्या या निर्णयाविरोधात शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेत जागा स्वीकृतीसाठी वाढीव शुल्काचा निर्णय विद्यार्थीविरोधी, अन्यायकारक आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांना हरताळ फासणारा आहे. प्रत्येक ‘बेटरमेंट’वेळी सीईटीकडून विद्यार्थ्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार विद्यार्थ्यांच्या हिताचा नसून, अधिकृतरित्या वसुलीचे साधन आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर अधिक चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘बेटरमेंट’ची व्यवस्था केली आहे. मात्र सीईटी कक्षाने तीच संधी बंद करण्याचे काम केले आहे. विद्यार्थी-केंद्रित प्रवेश प्रक्रिया राबविण्याऐवजी कंत्राटदारांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुल्कवाढीचा हा निर्णय तातडीने रद्द करावा, अन्यथा राज्यातील विद्यार्थी, पालक आणि विविध विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शिवसेनेचे (शिंदे) सचिव व माजी सिनेट सदस्य ॲड. वैभव थोरात यांनी दिला.
राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये १ लाख ७७ हजार ९८५ जागा असून, प्रत्येक जागेसाठी एक हजार स्वीकृती शुल्क आकारल्याने जवळपास १७ कोटी ७९ लाख ८५ हजार रुपये सीईटीकडे जमा होतात. नव्या नियमानुसार दुसऱ्या फेरीमध्ये दोन हजार व तिसऱ्या फेरीमध्ये तीन हजार रुपये म्हणजे बेटरमेंटला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना साधारणपणे सहा हजार रुपये भरावे लागणार आहे. त्यामुळे वसूल करण्यात येणारी रक्कम ही १०० कोटीपेक्षाही जास्त आहे. सीईटीकडून अधिकृतरित्या विद्यार्थी व पालकांची लूटमार केली जात असल्याचे अभियांत्रिकी समुपदेशक योगेश्वर गुट्टे यांनी सांगितले.
गुणवत्तेच्या आधारे चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक बेटरमेंटवेळी अतिरिक्त शुल्क भरण्यास भाग पाडणे चुकीचे आहे. शिक्षणाच्या हक्कावर आर्थिक अडथळे निर्माण करणारा हा निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा. शासनाने पालकांची आर्थिक लूट थांबवून बेटरमेंट प्रक्रियेसाठी आकारले जाणारे अतिरिक्त शुल्क रद्द करावे, अशी मागणी शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक डाॅ. माधव सूर्यवंशी यांनी केली.




