
मुख्यमंत्र्यांच्या गृह शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी जीवघेणे; साडेचार वर्षांत ३७३ जणांचा बळी!
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपूरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी किती असुरक्षित झाले आहेत, याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे. साडेचार वर्षांत झालेल्या २ हजार ५५६ रस्ते अपघातांमध्ये १ हजार १२७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील तब्बल ३७३ मृत्यू पादचाऱ्यांचे आहेत. म्हणजेच अपघातातील प्रत्येक तीन मृतांपैकी एक जण पायी चालणारा होता.
शहरातील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण चिंतेचा विषय ठरत असतानाच पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुढे आला आहे. १ जानेवारी २०२२ ते ३१ मे २०२६ या कालावधीत नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत झालेल्या रस्ते अपघातांची माहिती अधिकारातून समोर आली असून, त्यात पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण धक्कादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहरातील अपघातांची स्थिती काय आहे?
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, साडेचार वर्षांत नागपूर शहरात एकूण २ हजार ५५६ रस्ते अपघात झाले. यापैकी ३९८ अपघात हे पादचाऱ्यांशी संबंधित होते. या अपघातांमध्ये ३७३ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. शहरातील एकूण अपघाती मृत्यूंची संख्या १ हजार १२७ असून, त्यातील जवळपास ३३ टक्के मृत्यू हे पादचाऱ्यांचे आहेत.
पादचाऱ्यांच्या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त का?
पादचाऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांना थेट गंभीर दुखापती होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे ३९८ अपघातांमध्ये तब्बल ३७३ जणांचा मृत्यू झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी सुरक्षित पदपथ, रस्ता ओलांडण्यासाठी योग्य व्यवस्था आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी नसल्याने ही स्थिती निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
माहिती अधिकारातून ही माहिती कुणी मिळवली?
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकारातून ही आकडेवारी मिळवली आहे. या आकडेवारीमुळे नागपूर शहरातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
इतर अपघातांची स्थिती काय?
माहितीनुसार, या कालावधीत अवजड वाहनांमुळे ५१८ अपघात झाले असून त्यात ३५२ जणांचा मृत्यू झाला. महामार्गांवर झालेल्या ७४० अपघातांमध्ये ४७७ जणांना जीव गमवावा लागला. पुलांवर झालेल्या ४३ अपघातांत ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच टँकर, सिमेंट मिक्सर आणि मालवाहू वाहनांच्या धडकेत १६० जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत पोलीस विभागातील नऊ कर्मचाऱ्यांचाही रस्ते अपघातात मृत्यू झाला.
पादचाऱ्यांच्या अपघातांमागील प्रमुख कारणे कोणती?
शहरातील वाहतूक नियोजनात पादचारी सुरक्षेला पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पदपथांवरील अतिक्रमण, झेब्रा क्रॉसिंगचा कमी वापर, भरधाव वाहने आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी न होणे ही पादचारी अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे अभय कोलारकर यांनी सांगितले.
अपघात कमी करण्यासाठी काय उपाय आवश्यक आहेत?
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, शहरातील पदपथ सुरक्षित करणे, पादचारी पूल उभारणे, झेब्रा क्रॉसिंगची प्रभावी अंमलबजावणी करणे, वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि चौकांवर वाहतूक व्यवस्थापन मजबूत करणे आवश्यक आहे. पादचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याशिवाय अपघातांचे प्रमाण कमी करणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.




